धाराशिव (प्रतिनिधी) -सोलापूर - तुळजापूर - धाराशिव रेल्वे मार्गासाठी संपादित होत असलेल्या जमिनीला जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करण्यावरच अधिक भर असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

महत्त्वाचे प्रकल्प लवकर व्हावेत यासाठी सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जाते. मात्र जिल्ह्यातील शेतकरी या रेल्वे प्रकल्पाबाबत पूर्णतः सकारात्मक असून खाजगी वाटाघाटीने जमीनी देण्यास तयार असल्याचे भेटून सांगत आहेत. खाजगी वाटाघाटीने प्रक्रिया पूर्ण होणार असेल तर सक्तीच्या भूसंपादनाची गरजच वाटत नाही. त्यामुळे या रेल्वे मार्गासाठी आवश्यक धाराशिव जिल्ह्यातील 32 गावातील एक हजार 375 एकर जमीन खाजगी वाटाघाटीने संपादित करणे बाबत चा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे. 

या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असून सोलापूर जिल्ह्यातील 30 किलोमीटर रेल्वे मार्गासाठी नुकतीच निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू असून शेतकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार शेतकरी खाजगी वाटाघाटी द्वारे भूसंपादनास तयार आहेत. राज्यातील काही रेल्वे मार्गासाठी याप्रकारे भूसंपादन करण्यात आलेले आहे. 

शासनाकडून मिळणाऱ्या दराबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम आहे. अनेक गावच्या शेतकऱ्यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेवून खाजगी वाटाघाटीने भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याची विनंती केली आहे. महायुती सरकार शेतकरी हिताचे सरकार असून संपादीत जमीनीला प्रचलीत शासकीय निकषांचा योग्य वापर करुन जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.

ठाकरे सरकारच्या अनास्थे मुळे रखडलेल्या या प्रकल्पाचे काम पुढील 2 वर्षात पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आलेले आहे. दराबाबतचा शेतकऱ्यानं मधील संभ्रम दूर करून जास्तीत जास्त मावेजा देण्यासाठी खाजगी वाटाघाटीने भूसंपादन करण्यावरच भर देण्यात येत असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.


 
Top