तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील सहाव्या शतकातील उत्तरेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गर्भगृहाची लाकडी द्वारशाखा .ही एकमेव द्वितीय ठराविक उत्कृष्ट कलाकृती आहे.
या द्वाराला पाच शाखा असून त्याला नंदिनी प्रकारचे जेष्ठ द्वार म्हणतात. या द्वारशाखेच्या सर्वात आतील बाजूस चौकोनी शंकरपाळ्याच्या आकाराची नक्षी असून त्यामध्ये फुले आहेत. द्वाराची चौथी शाखा ही व्याल शाखा आहे तर पाचवी द्वारशाखा ही वेलबुटीच्या नक्षीची आहे .ह्या नक्षीमध्ये वेली असून एका बाजूला वळलेल्या तिच्या नाजूक कळ्या आहेत तर दुसरीकडे पूर्णोन्मिलीत पुष्प आहेत. त्या पुष्पाच्या भाराने त्या वेलीची अनुभूती येते अजून एक अनोखी जाणीव म्हणजे एका सौंदर्याची तुलना करावयास जवळच दुसरे सौंदर्य उभे आहे .ह्या स्त्रियांपैकी बऱ्याच जणींनी त्या वेलीस हात लावला आहे.
जणू काही त्यांची उत्पत्ती वेलीतून झाली आहे असे वाटते. द्वारशाखेतील स्त्री-पुरुष अलंकारांनी युक्त आहेत. स्त्रियांच्या केशरचना वैशिष्ट्यपुर्ण आहेत. .द्वाराच्या वरच्या बाजूस गणेशपट्टी असून तिच्या खाली आणि वरील बाजूस नक्षी आणि मूर्ती आहेत. सर्वात आतील बाजूस चौकोनी भूमितीक नक्षी आहे. गणेश पट्टीच्या मधले शिल्प झिजल्याने ओळखता येत नाही. नंतर मंदिराच्या शिखराप्रमाणे रचना आहे तर त्याच्यावरील पट्टीत निरनिराळ्या देवतांची शिल्पे आहेत. त्यावरील शाखा ही दंपत्तीशाखा आहे. त्यावरील भागात व्याल आणि वेलबुट्टी आहे. द्वाराच्या मधोमधल्या पट्ट्यावर डावीकडून पहिली एका पुरुषाची मूर्ती आहे. त्या मूर्ती नंतर तीन सनईवादक आहेत. त्यानंतरच्या मूर्तीच्या हातात झांज आहे दोन चामरधा–यांच्या मध्ये पद्मासनात कमळावर बसलेली चतुर्भुज मूर्ती आहे. तिच्या मस्तकावर पाच फणे असलेला नाग आहे. ही मूर्ती योगमुद्रेत आहे. तिच्या उजव्या हातात गदा तर डाव्या हातात नाग असून खालचे दोन्ही हात योगमुद्रेत आहेत. त्यानंतर द्विभंग अवस्थेत बसलेली चतुर्भुज आणि त्रिमुखी ब्रह्माची मूर्ती आहे. तिच्या उजव्या हातात कुर्च आहे. दुसरा हात खाली सोडला आहे. डाव्या हातात कमंडलू आहे. दुसरा हात दिसत नाही. ही मूर्ती सालंकृत आहे. त्यानंतरची मूर्ती ही पद्मासनातच आहे आणि ती षट्भुज व त्रिमुख आहे. त्यांच्या डावीकडील तीन हातात नाग, कमळ व शंख आहेत. अत्यंत सुंदर कलात्मक अशी ही द्वारशाखा आहे .ही द्वारशाखा बनवताना कलाकाराने आपले कसब पणाला लावण्याचे दिसते. एकमेव द्वितीय ठरावी अशी ही उत्कृष्ट कलाकृती आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही लाकडी सागवानाची चौकट तेर येथील कै.. रामलिंग आप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू वस्तुसंग्रहालयात आणून जतन करण्यात आली आहे.