नळदुर्ग (प्रतिनिधी)- दुष्काळाची परीस्थिती निर्माण झालेली असतानाही नळदुर्ग शहरात गणेश भक्तांकडुन वाजत, गाजत व गणपती बाप्पा मोरया चा प्रचंड जयघोष करीत गणरायाचे स्वागत करण्यात आले.
दि.19 ते 28 सप्टेंबर 2023 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. दि.18 सप्टेंबर रोजी श्री गणरायांचे नळदुर्ग शहरात गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वागत केले. सकाळी शहरांतील प्रत्येक हिंदु बांधवांच्या घरात श्री गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील शिवशाही तरुण गणेश मंडळ, जय हिंद तरुण गणेश मंडळ, व्यासनगर, व्यापारी गणेश मंडळ, नव चैतन्य तरुण गणेश मंडळ, जय हनुमान गणेश मंडळ, धर्मवीर संभाजी तरुण गणेश मंडळ, न्यु–चैतन्य तरुण मंडळ, शिवनेरी तरुण गणेश मंडळ, जय हिंद तरुण गणेश मंडळ पोलिस ठाणे,माऊली गणेश मंडळ, वीर महाराणा प्रताप तरुण गणेश मंडळ, भोईराज गणेश मंडळ, जय भवानी तरुण गणेश मंडळ, इंदिरानगर गणेश मंडळ या प्रमुख गणेश मंडळासह जवळपास 20 गणेश मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी श्री गणरायांची प्रतिष्ठापणा केली आहे. रात्री उशिरापर्यंत श्री गणरायांची प्रतिष्ठापना सुरू होती. वाजत–गाजत तसेच पारंपरीक ढोल व हलग्यांच्या वाद्यात श्री गणरायांचे स्वागत करण्यात आले.
श्री गणेशोत्सवानिमित्त नळदुर्ग पोलिस ठाणा हद्दीतील 21 गावांमध्ये “एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. त्याचबरोबर नळदुर्ग पोलिस ठाणा हद्दीत 156 सार्वजनिक गणेश मंडळांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. तर नळदुर्ग शहरात 20 गणेश मंडळांनी श्री गणरायांची प्रतिष्ठापना केली आहे.
नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी गणेशोत्सव कालावधीमध्ये शांतता राहावी यासाठी संपुर्ण पोलिस ठाणा हद्दीत कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये राज्य राखीव पोलिस दलाचे जवान, पोलिस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवान बंदोस्तांसाठी तैनात करण्यात आले आहेत.