नळदुर्ग (प्रतिनिधी)- मराठा समाजाला कुठलीही अट न घालता सरसकट ओबीसीचे आरक्षण द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांनी दि.8 सप्टेंबर रोजी नळदुर्ग येथे सकल मराठा समाजाच्या वतीने अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात बोलतांना म्हटले.

अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ व मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्यावे या मागणीसाठी नळदुर्ग, येडोळा,वागदरी, दहिटना, शहापुर, चिकुंद्रा, बोरगाव, मुरटा,जळकोट, सलगरा मड्डी, सलगरा दि., सिंदगाव,कुनसावळी,बोळेगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने नळदुर्ग शहर बंद, मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नळदुर्ग शहर शंभर टक्के कडकडीत बंद करण्यात आले होते.

या मोर्चात शेकडो मराठा समाज बांधव सहभागी झाला होता. यामध्ये युवकांची संख्या मोठी होती. मोर्चातील नागरीकांनी डोक्यावर भगवी आणि हातात भगवा झेंडा घेतला होता त्यामुळे संपुर्ण नळदुर्ग शहर भगवेमय झाल्याचे दिसुन येत होते. तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.

यावेळी अशोक जगदाळे, कमलाकर चव्हाण, योगेश केदार, बालभीमराव मुळे, अमोल पाटील यांनीही आपल्या सरकारवर हल्लाबोल करताना मराठा समाजाला तात्काळ सरसकट ओबीसीचे आरक्षण द्यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मंडळ अधिकारी जयंत गायकवाड व सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तानाजी जाधव यांनी केले.

या मोर्चा व रास्ता रोको आंदोलनामध्ये अशोक जगदाळे,माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, कमलाकर चव्हाण,  नानासाहेब पाटील, संजय जाधव, बालाजी मोरे,अमोल पाटील, राजेंद्र जाधव, तानाजी जाधव, गणेश मोर्डे, दीपक काशिद, शरद बागल, बबन चौधरी, श्रीधर नरवडे, डॉ. जितेंद्र पाटील, वैभव पाटील,उमेश जाधव यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधव सहभाही झाला होता. यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनाला शहरांतील विविध संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. यावेळी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोखंडे यांनी अतीशय कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.   


 
Top