धाराशिव (प्रतिनिधी)-आदिवासी पारधी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. त्याकरिता या समाजातील व्यक्तींना आधार कार्ड, रेशन कार्ड आणि मतदार यादीत नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. म्हणून शासन आपल्या दारी योजनेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या योजनांचा पारधी समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.

महसूल व वन विभाग आणि धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात मंगळवारी (दि.5) शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत तालुक्यातील आदिवासी, पारधी, विमुक्त जाती जमाती आणि भटक्या समाजातील लाभार्थ्याना जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, मतदार नाव नोंदणी, आधार नोंदणी तसेच निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी योगेश खरमाटे, तहसिलदार शिवानंद बिडवे, प्रशिक्षणार्थी तहसिलदार काकडे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड, आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, माजी नगरसेवक बापू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की, पारधी समाजबांधवांना यापुढे पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यासाठी त्रास दिला जाणार नाही. म्हणून समाजातील तरुणांनी यापुढे चोरीचा मार्ग न अवलंबता व्यवसायाकडे वळावे. शासन स्तरावर आवश्यक ती मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. जिल्हा पोलीस मुख्यालयात पारधी समाजातील तरूणांसाठी मोफत पोलीस भरती प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचा पारधी समाजातील तरूणांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.गुप्ता यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील आदिवासी पारधी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभरात शासकीय योजना आणि प्रमाणपत्रांपासून वंचित असलेल्या आदिवासी पारधी समाज बांधवांची नोंदणी करण्यासाठी महसूल प्रशासनातील नायब तहसीलदार श्वेता घोटकर, संदेश भोसले, तलाठी श्रीधर माळी,

मंडळ अधिकारी श्रीनिवास पवार व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


 
Top