नळदुर्ग (प्रतिनिधी)- लोकतंत्र सेनानी संघाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणुन नळदुर्ग येथील बलभीमराव मुळे यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांच्या नियुक्तीचे सर्व स्तरांतुन स्वागत होत आहे.
बलभीमराव मुळे हे नळदुर्ग येथील रहिवासी असुन सन 1975 ते 1977 या आणीबाणीच्या कालावधीत त्यांना तुरुंगवास झाला होता. देशात आणीबाणी लागु केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात पहिली अटक ही बलभीमराव मुळे यांची झाली होती.मिसा बंदी या कायद्याखाली त्यांना अटक झाली होती. त्यावेळी तुरुंगात त्यांच्यासोबत स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यासह अनेक मातब्बर मंडळी होती. तुरूंगातुन सुटका झाल्यानंतर नळदुर्ग येथील भवानी चौकात उद्धवराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता. सध्या त्यांना महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा दिला आहे.
आणीबाणीच्या काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला आहे त्यांनी अखिल भारतीय स्तरावर लोकतंत्र सेनानी संघाची स्थापना केली आहे. सध्या या लोकतंत्र सेनानी संघाच्या माध्यमातुन ही मंडळी कार्य करीत आहेत. लोकतंत्र सेनानी संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बलभीमराव मुळे यांची नियुक्ती करण्यात आली असुन लोकतंत्र सेनानी संघाचे प्रदेश अध्यक्ष मधुसुदन उमेकर व कार्याध्यक्ष रघुनाथ दीक्षित यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे. ही नियुक्ती सन 2023 ते 2026 या कालावधीसाठी करण्यात आली आहे. बलभीमराव मुळे यांच्या या नियुक्तीचे सर्व स्तरांतुन स्वागत होत आहे.