धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून या लढ्यात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि स्वातंत्र्य सैनिक हयात नसलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वीरपत्नींचा भव्य सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वातंत्र्य सैनिक श्री यशवंतराव उपाख्य बुबासाहेब जाधव हे लाभले होते. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते म्हणाले की, आपण जवळपास साडेसहाशे वर्ष निजाम राजवटीमध्ये गुलाम म्हणून राहिलेलो आहोत. खऱ्या अर्थाने आपण 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वातंत्र्य झालो. म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यासाठी खूपच महत्त्वाचा असा दिवस आहे.
प्रमुख व्याख्याते म्हणून उस्मानाबाद येथील नगरसेवक युवराज नळे हे होते. युवराज नळे याप्रसंगी बोलताना म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी केलेल्या संघर्षामुळे आपण आज मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकलो. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसंग्राम लढ्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, या लढ्यात अनेक सैनिकांनी आपले बलिदान दिले आहे, त्यामुळेच आपण मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देऊ शकलो. त्यांचे स्मरण विद्यार्थ्यांना राहावे, मराठवाडा मुक्ती संग्राम लढा विद्यार्थ्यांना समजावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वीरपत्नी यांचा महाविद्यालयात भव्य सत्कार केल्याने समाधान व्यक्त होत आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वीर पत्नी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. माधव उगिले यांनी केले, सूत्रसंचलन डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. मोहन राठोड यांनी मानले. सदर कार्यक्रम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते.