धाराशिव (प्रतिनिधी)- थकीत वेतन आणि अजुभाई इलेक्ट्रीकल्स या कंत्राटदार कंपनीचे कंत्राट रद्द करण्याच्या मागणीसाठी विविध प्रलंबित मागण्यासाठी कंत्राटी वीज कामगारांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण मंगळवारी (दि.12) सहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले.

धाराशिव जिल्ह्यात विविध 3 एजन्सीमार्फत महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापैकी दोन कंपन्यांचे काम सुरळीत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अजुभाई इलेक्ट्रीकल्स या एजन्सीमार्फत परंडा, भूम आणि तेर उपविभागात कंत्राटी कामगार नियुक्त करण्यात आलेले आहेत. या कामगारांना जून, जुलै व ऑगस्ट महिन्याचे वेतन अदा करण्यात आले नव्हते. आंदोलन करणार असल्याचे समजल्यानंतर एक महिन्याचे वेतन देण्यात आले. परंतु उर्वरित वेतन अद्याप न मिळाल्यामुळे कंत्राटी वीज कामगारांनी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन अखेर महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. सदरील कंपनीला बजावलेल्या नोटीसीची प्रत उपोषणकर्त्यांना देऊन तसेच संघटनेला उपोषण आंदोलन मागे घेण्याबाबतचे पत्र मंगळवारी देण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने उपोषण आंदोलन स्थगित केले. यावेळी महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारुती गुंड, उपाध्यक्ष सुशील उपळकर, परंडा तालुकाध्यक्ष दिनेश सांगडे यांच्यासह कंत्राटी वीज कामगार ज्ञानेश्वर माने, रमजान मोगल, गोपीनाथ इटकर, धर्मराज शेळवणे, तानाजी शेळवणे, दत्ता साळुंके, समाधान उगले, हनुमंत अंधारे, हणमंत समिंदर, ज्ञानेश्वर लिमकर, बालाजी साढाळे, ज्ञानेश्वर जानकर, अतुल अनुसे, विशाल भोगील, भागवत हेगडकर यांच्यासह इतर कंत्राटी वीज कामगार उपस्थित होते.


 
Top