धाराशिव (प्रतिनिधी)- मुंबईतील आंतरराष्ट्रीय पातळीवरील 'टेकटेक्स्टिल' प्रदर्शनात कौडगावाचे तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्पाचे दालन लक्षवेधी ठरत आहे. कौडगावाच्या औद्योगिक वसाहतीकडे जगभरातील उद्योजक आकर्षित व्हावे आणि त्यातून मोठी गुंतवणूक यावी यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून हे दालन उभारण्यात आले आहे. त्यामुळे दहा हजार रोजगार निर्मितीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल पुढे पडले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

भारत सरकारच्या वस्त्रनिर्मिती विभागाच्या माध्यमातून तांत्रिक वस्त्रनिर्मिती उद्योगाशी संबंधित आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य प्रदर्शन मुंबईत आयोजित करण्यात आले आहे. 12 ते 14 सप्टेंबर असे दोन दिवस हे प्रदर्शन चालणार आहे. यात एमआयडीसीने ‌‘कौडगाव टेक्निकल टेक्सटाईल्स पार्क' चे दालन उभारले आहे. देश विदेशातील अनेक उत्पादक कंपन्याही यात सहभागी झाल्या आहेत. 

जिल्ह्यातील कौडगाव एमआयडीसीमध्ये तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित करण्याकरिताच 'टेकटेक्स्टिल' या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात एमआयडीसीच्या माध्यमातून हे दालन लावण्यात आले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंगळवारी या प्रदर्शनाला भेट देवून सहभागी उद्योजकांशी चर्चा केली. यातील काही उद्योजकांनी धाराशिवला गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्त सकारात्मकता दर्शविली असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रदर्शनीला भेट देवून या क्षेत्रातील नामांकित उद्योजकांशी चर्चा केली. एमआयडीसी व कपीएमजी चे अधिकारीही यावेळी त्यांच्या सोबत होते. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकार कडून देण्यात येत असलेल्या विशेष सवलती व लाभाची माहिती यावेळी दिली. कौडगाव एमआयडीसीमध्ये प्रकल्पसाठी मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. पाणी, वीज तथा गॅस यासारख्या पायाभूत सुविधेसह रस्ते व रेल्वे मार्ग या दळणवळणाच्या सुविधाही उपलब्ध आहेत. तांत्रिक वस्त्र उत्पादनाच्या विविध क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे या क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. इतर उद्योगांच्या तुलनेत तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्प धाराशिवला आणण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत. सतत पाठपुरावा करून मोठ्या आग्रहाने धाराशिवला देशातील पाहिलाच तांत्रिक वस्त्रनिर्मिती प्रकल्प एमआयडीसीच्या माध्यमातून मंजूर करवून घेण्यात आला असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.


दालन उभारण्यासाठीही केला पाठपुरावा

एमआयडीसीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील या प्रदर्शनीमध्ये कौडगावाचे दालन प्राधान्याने उभारण्यात यावे यासाठी आमदार पाटील यांनी सूचना केली होती. त्यानुसार दालन मांडण्यात आले. जगभरातील अनेक उद्योजक या दालनाला भेट देवून माहिती घेत आहेत. एमआयडीसीचे अधिकारी व त्यांची मार्केटिंग टीम परिपूर्ण माहिती देत आहे. जागतिक दर्जाच्या काही उद्योजकांनी कौडगावला प्रकल्प उभारण्यासाठी उत्सुकताही दर्शविली आहे. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनीच्या माध्यमातून निश्चितच या क्षेत्रातील एखादा अँकर प्रकल्प धाराशिवला मिळेल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.


यावेळी आमदार पाटील यांच्या समवेत डी.के.टी.ई.सोसायटीचे टेक्सटाइल ॲण्ड इंजिनियरिंग इन्स्टिट्युटचे सी.ए.पाटील, मुख्य अभियंता एमआयडीसी राजेंद्र गावडे, के.पी.एम.जी कन्सल्टंट धनश्री जाधव आदी उपस्थित होते.


 
Top