उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा तालुक्यातील नारंगवाडी मंडळ हे ‌‘पिक परिस्थिती  व हंगामातील प्रतिकुल परिस्थितीमुळे नुकसान भरपाई निश्चित करणे ” संदर्भात निश्चित करावयाच्या जाचक नियमामुळे अग्रीम पासुन वंचित राहिले आहे. परिणामी मंडळातील जवळपास एकुण 16 गावातील शेतकऱ्यांना सद्याची दुष्काळग्रस्त परिस्थिती असतानाही हक्काचा पीकविमा किंवा शासकीय मदत मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता नारंगवाडी मंडळाचा पर्जन्यमानाचा पुर्व इतिहास पाहता ऑगस्ट महिन्यात 124 मी.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात महिन्याभरात केवळ 21 मी.मी. म्हणजे 16% एवढ्या पर्जन्यमनाची नोंद झाली आहे. त्यामुळे नारंगवाडी मंडळाचा 25 टक्के अग्रीमसाठी समावेश करण्याच्या मागणी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे.

याच बरोबर शोकांतिकेची गोष्ट म्हणजे नारंगवाडी मंडळात सलग दि.10/08/2023 ते दि.29/08/2023 रोजीच्या संध्याकाळपर्यंत 20 दिवस पाऊस पडला नाही. व दि.29/08/2023 रोजी 20 व्या दिवशी केवळ नारंगवाडी येथील रेनगेज परिसरात केवळ 8 मी.मी पाऊस पडला. विशेष म्हणजे सदर पाऊस संपुर्ण नारंगवाडी गावासह मंडळातील इतर 15 गावात पडलाच नाही. यानंतरच्या पुढील 05 दिवसही सदर मंडळात पाऊस पडला नाही. परंतु 20 व्या दिवशी नेमका रेनगेज वर पाऊसाची नोंद झाल्यामुळे अग्रीमसाठी पात्र होण्याचा सलग 21 दिवसाच्या नियमात खंड पडला. 

तरी नारंगवाडी मंडळासह संपुर्ण उमरगा व लोहारा तालुक्यात अग्रीमसाठी व इतर नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी पात्र होणे करिता प्राप्त परिस्थितीनुसार प्रत्यक्ष होत असलेल्या नुकसानीचा विचार करून शासन निर्णयातील तरतुदीचा फेर विचार व्हावा व उमरगा-लोहारा तालुक्यात दुष्काळी उपाययोजना आखणे बाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे व कृषी अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे मागणी केली आहे.

 

 
Top