धाराशिव (प्रतिनिधी)- “भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इसरो) चांद्रयान-3 मोहीम यशस्वी करत सर्व भारतीयांची शान वाढवली आहे. अशा संशोधन मोहीमा भविष्यात यशस्वी होण्यासाठी शालेय वयातच विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लागावी. 'नासा' प्रशिक्षण कार्यक्रमातून नव्या पिढीतील अनेक संशोधक तयार होतील,“ असे मत प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत खंदारे यांनी व्यक्त केले.

अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन (नासा), तसेच सिंगापूर सायन्स सेंटर येथील प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवडण्यात आलेल्या 23 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. खंदारे बोलत होते. स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलच्या वतीने इयत्ता 6 वी  ते 10 वी च्या मुलांसाठी नुकतीच ही परीक्षा घेण्यात आली होती. यातील 11 विद्यार्थी 'नासा', तर 12 विद्यार्थी सिंगापूरला जाणार आहेत. यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील अनुष्का उमेश बारकूल हिचा समावेश आहे. 

कोथरूड येथील भारती विद्यापीठाच्या विधी महाविद्यालय सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर, महिला व बालकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, कस्टमचे आयुक्त राजेश डाबरे, आयएएस प्रेरणा देशभ्रतार, डॉ. पल्लवी दराडे, युएस स्पेस अँड रॉकेट सेंटरच्या अँबेसेडर व स्वान फाउंडेशनच्या संचालक सुदेष्णा परमार, स्वान फाउंडेशन आणि सेडॉर इंटरनॅशनलचे संचालक एम. तिरुमल, आयेशा सय्यद, स्वान फाऊंडेशनचे संस्थापक संचालक शशिकांत कांबळे, संचालक अश्विनी सांळुके आदी उपस्थित होते.

सुदेष्णा परमार यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली. शशिकांत कांबळे यांनी प्रास्ताविक केले. श्रीराम शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. आयेशा सय्यद यांनी आभार मानले.


 
Top