तुळजापूर (प्रतिनिधी)- दुध दरवाढ, शेतीमालाला हमीभावासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांना बुधवारी (दि.9) निवेदन देण्यात आले. 

पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत हे धाराशिव जिल्हा दौर्‍यावर आले असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे यांनी त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शेतकर्‍याच्या दुधाला प्रतिलिटर 45 रूपये वाढ मिळावी. शासनाकडून मंजूर झालेले अनुदान व पीकविमा तात्काळ शंभर टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावा, शेतकर्‍यांच्या मुलीला लग्नासाठी प्रत्येकी 10 लाख रूपये मदत द्यावी, डीपी व दुरूस्तीसाठी वीज मंडळाला शेतकर्‍यांना खर्च करावा लागत आहे. तो खर्च शासनाकडून करण्यात यावा, कृषी विभागांतर्गत पोक्रा योजना धाराशिव जिल्ह्यासाठी चालू करण्यात यावी, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून शेतीमालाला हमीभाव तसेच शेतकर्‍यांना मोफत वीज द्यावी, शेतकर्‍यांना देण्यात येणारे पीककर्ज अनुदान तात्काळ मंजूर करून पीककर्जासाठी अडवणूक करणार्‍या बँक अधिकारी व कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी. शेतकर्‍यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पालकमंत्री म्हणून आपण पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


 
Top