धाराशिव (प्रतिनिधी)-येणार्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख कैलास घाडगे पाटील यांनी केले.
विधानसभा संपर्क प्रमुख अरुण नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव येथील विश्रामगृहात बुधवारी (दि.9) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये पक्ष संघटन आणि आगामी विविध निवडणुका तसेच पक्ष विस्ताराविषयी आणि आगामी काळामध्ये पक्षाची वाटचाल कशी असेल या विषयी धाराशिव शहरातील शाखाप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
आगामी काळात पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे कार्य घराघरापर्यंत पोहचवणे, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला. बैठकीत नवनियुक्त शाखाप्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांच्यासह ज्येष्ठ शिवसैनिक जि.प. सदस्य, नगरसेवक, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, तसेच शहरातील पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.