धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवार दि. 9 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पीक पाणी, एस. टी. महामंडळ, बॅकेचे पीककर्ज, महावितरणचे काम, आरटीओ कार्यालय, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मागाचे भूसंपादन आदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी महावितरणच्या कामाबाबत जिल्ह्यात सर्वत्र नाराजी असून, मी वीज मंत्री नसल्यामुळे तुम्ही माझे ऐकत नाही का? असा प्रश्न विचारून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. 

पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांची आढावा बैठक दुपारी 2 दोन वाजता सुरू झाल्यानंतर तीन तास चालली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे,जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,सहाय्यक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे,सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे  जि. प. चे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, दत्ता साळुंके, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, अनिल खोचरे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी व सर्व विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांनी शेत रस्त्यांच्या फलनिष्पत्तीबाबत व एकूण 665 पैकी 555 शेत रस्ते मोकळे केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे पालकमंत्र्यानी कौतूक केले. या बैठकीत जिल्ह्यातील अपुर्‍या पावसामुळे पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे. प्रत्येक गावात स्मशानभुमी करणे याचा आढावा घेवून वर्ग 1 च्या जमिनी 2 वर्ग मध्ये प्रशासनाने कोणत्या कारणामुळे घेतल्या. यावेळी पालकमंत्री सावंत यांनी प्रशासनच्या चुकीमुळे शेतकर्‍यांना त्रास होत आहे. महाराष्ट्रात कुठेही असा प्रकार नसताना आपल्यास जिल्ह्यातच का? असा प्रश्न उपस्थित केला. वर्ग 2 मध्ये घेतलेल्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये घेण्यासाठी त्वरीत प्रस्ताव पाठवा असे सांगून त्यांनी संबंधित संदर्भात त्यांनी नाराजी व्यक्त केली. पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावरील लोकांची कामे त्वरीत करावीत. एक ही फाईल पेंडींग ठेवून नका अशाही सूचना त्यांनी दिल्या. 

महावितरणाच्या कामाबाबत गावागावात लोकांची नाराजी आहे. शेतकर्‍यांकडून काही घेतल्याशिवाय कामे होत नाहीत असे स्पष्ट शब्दात सांगून पालकमंत्री सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना महावितरणाच्या कामकाजाबाबत प्रत्येक आठवड्यात  एक बैठक आपण घ्यावी अशी सूचनाही त्यांनी केली. वाशी येथील 135 के.व्ही. नियोजीत स्टेशनचा प्रस्ताव त्वरीत पाठविण्याची सुचना त्यांनी केली. 

जिल्हयातील बँकांनी शेतकर्‍यांना सहकार्य करण्याचे सांगताना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले, शेतकर्‍यांची  अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वर्ग करण्यात येऊ नये. तसेच कर्ज देताना सिबील आणि वयाची कारणे देऊन कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या बॅकांविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 

जिल्हयात लायन्सस नसलेल्या वाहनधारकांची संख्या वाढत आहे. त्यामूळे जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात आरटीओ ऑफिसने शिबीर घ्यावे व त्याबाबत योग्य ती प्रसिध्दी करून प्रत्येक वाहनधारकांना लायसन मिळेल यादृष्टीने काम करावे असे पालकमंत्री डॉ. सावंत म्हणाले.


नव्या बसस्थानकाचा प्रस्ताव दाखल करा

एसटी महामंडळाविषयी आढावा घेताना आपण नवीन किती एसटी बसेस मागविल्या आहेत, किती आल्या आहेत, कमी उत्पन्नातील किती बसेस बंद केल्या आहेत या संदर्भात विचारल्यानंतर एसटीचे विभाग नियंत्रक यांनी नव्या 30 गाड्या आल्या असून आपण नवीन 100 गाड्यांची मागणी केली होती असे सांगून कमी उत्पन्नावरील गाड्या बंद केल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री यांनी उत्पन्न कमी म्हणून शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय करून नका असे सांगून प्रायोगिक तत्वावरील काही बसेस चालू ठेवा असे सांगितले. भूम-परंडा नवीन बसस्थानकाचे काम लवकर सुरू करा असे सांगून धाराशिव येथील बसस्थानकाच्या कामाचा प्रस्ताव त्वरीत पाठवून द्या. ते काम कसे करायचे याची जबाबदारी घेतो असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.



 
Top