धाराशिव (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील एक वर्षात 16 हजार मेगावॅट विजेचा शेतीला दिवसा पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी धाराशिव जिल्ह्यातील पाडोळी येथे बुधवारी दि. 23 जुलै रोजी दिली.
कळंब तालुक्यातील पाडोळी येथे क्लिनहेडेज न्यू एनर्जीज प्रा. ली. आणि आदित्य ग्रीन एनर्जी विकासकांच्या सहाय्याने पूर्ण झालेल्या 6 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन लोकेश चंद्र यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जिवने, संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार, संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे व धनंजय औंढेकर, मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, अधीक्षक अभियंता धाराशिव संजय आडे, प्रशांत दाणी लातूर, प्रेमसिंग राजपूत बीड यांची उपस्थिती होती.
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेला राज्यात सर्व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने मोठा वेग मिळाला आहे. या योजनेचा अभ्यास व अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, राज्यस्थान या राज्यांतील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी येत आहेत. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठ्यासह वीज खरेदीचे दर किफायतशीर राहणार आहे. त्यामुळे क्रॉस सबसिडीचा बोजा कमी होऊन प्रामुख्याने उद्योगांचे वीज दर आणखी कमी होतील. या योजनेमुळे राज्यात 65 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक आणि ग्रामीण भागात सुमारे 70 हजार नवीन रोजगार निर्माण होत आहे अशी माहिती लोकेश चंद्र यांनी दिली.
लातूर, धाराशिव अग्रेसर
राज्यात लातूर व धाराशिव जिल्हे मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 मध्ये अग्रेसर आहे. लातूर जिल्ह्यात 225 मेगावॅट क्षमतेचे 46 व धाराशिव जिल्ह्यात 28 क्षमतेचे 8 सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील 72 हजार शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. पाडोळी येथील 6 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून पाडोळी उपकेंद्र अंतर्गत पाडोळी, नायगाव, निपाणी, वडगाव, वाठवडा व पिंपरी या गावातील 2106 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.