धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयाची एक दिवसीय शैक्षणिक सहल छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथील बी-बियाणे संशोधन केंद्र, वेरुळ लेणी, बेबी का मकबरा, म्हैसमाळ, घृष्णेश्वर मंदिर, भद्रामारुती मंदिर या ठिकाणी नुकतीच जाऊन आली. या शैक्षणिक सहलीमध्ये विज्ञान शाखेतील 210 विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभाग घेतला.

सहलीच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, उद्यमशीलता, उद्योगव्यवसाय, विक्री व्यवस्थापन, उपलब्ध बाजारपेठा इत्यादी विविधांगी विषयांची माहिती होण्यासाठी औरंगाबाद जवळील नक्षत्रवाडी येथील एलोरा नॅचरल सीड्‍स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भेट देवून बि-बियाणे निर्मिती व त्यावरील संशोधन, विविध पिके व त्यांच्या वाणांची माहिती विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवाद्वारे घेतली.

भारतीय स्थापत्य शास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमुना आणि जागतिक वारसा स्थळ असलेली वेरूळची जगप्रसिद्ध लेणी विशेषतः लेणीसमुहातील कैलास मंदिर ही लेणी पाहून सर्व विद्यार्थी स्तिमित झाले. पाचव्या शतकातील राष्ट्रकूट राजांच्या काळातील समृद्ध असा ऐतिहासिक वारसा महाराष्ट्र भूमीत आहे याचे त्यांना कौतुक वाटत होते. पुढे विद्यार्थ्यांनी श्रावण सोमवाराचे औचित्य साधून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर भारतातील एकमेव निद्रावस्थेत असणाऱ्या भद्रा मारुतीचे दर्शन घेतले. मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून नावारूपाला आलेल्या म्हैसमाळ येथील निसर्गरम्य वातावरणाचा देखील आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. 

सहलीच्या शेवटी विद्यार्थ्यांनी बीबी का मकबरा या ऐतिहासिक वास्तूला भेट दिली. 1660 साली औरंगजेबचा मुलगा अजीमशहा याने आई दिलरस बानू बेगमच्या स्मरणार्थ बांधलेली आणि ताजमहल ची प्रतिकृती असलेली ही विलोभनीय ऐतिहासिक वास्तू विद्यार्थ्यांनी मनात आणि कॅमेऱ्यात कैद केली. 

विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेचा विकास करणे, त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनाशक्तीला वाव मिळावा आणि आपल्या ऐतिहासिक-पुरातन वारसा स्थळांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या हेतूने या एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या शैक्षणिक सहलीच्या नियोजनासाठी विद्यालयाचे प्राचार्य प्रा.देशमुख एस.एस., उपप्राचार्य प्रा.घार्गे एस.के., पर्यवेक्षक प्रा.हाजगुडे टी.पी. व इतर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

ही सहल निर्विघ्नपणे आणि शिस्तबद्धपणे संपन्न होण्यासाठी विद्यालयाचे सहविभाग प्रमुख प्रा. तेली एस.एल, प्रा.डोलारे एम.बी, प्रा.कापसे व्ही.एम, प्रा.माशाळकर पी.एस, प्रा.वीर व्ही.व्ही, प्रा.ऐवळे एस.जी, प्रा.वाकुरे एम.एच, प्रा.शेटे एस.पी, प्रा.गर्जे पी.ए, प्रा.सौ.मेटे पी.बी, प्रा.सौ.देशमुख एम.एम, प्रा.सौ.माने एस.एस, प्रा.सौ.भोसले एल.टी, प्रा.सौ.सुरवसे एस.आर, प्रा.सौ.वाघमारे पी.बी, प्रा.सौ.वडगणे के.ए., प्रा.सौ.शिंदे जे.एफ, प्रा.सौ.बंडगर डी.एम, .घोडके ए.व्ही, श्री.काळे एम.पी. यांनी परिश्रम घेतले.


 
Top