धाराशिव (प्रतिनिधी)-  उस्मानाबाद जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पशुसंवर्धन विभागामार्फत या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी सदर रोग प्रतिबंधक लसीकरण गोवर्ग पशुधनामध्ये देण्यासाठी लसिकरण मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. लम्पी चर्मरोग हा  सांसर्गिक रोग असल्याने व त्याचा प्रसार टाळण्यासाठी बाधीत जनावरे आढळून आल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागाशी संपर्क करून उपचार करून घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे. बाधीत जनावरांचे विलगीकरण करून निरोगी पशुधनास लसीकरण करून घेण्यात यावे. तसेच गोचीड, गोमांशा, डास, इत्यादी मुळे या रोगाचा प्रसार होत असल्याने या घटकांचे नियंत्रण बाह्य परजीवी नाशक औषधांचा वापर करून या बाह्य परजीवींवर नियंत्रण ठेवावे तसेच गोठे फवारणी करण्यात यावी.

या रोगाचा प्रसार वाढत असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन उस्मानाबाद यांनी दिलेल्या निर्देशानुसार उस्मानाबाद जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. या अनुषंगाने गोवर्गीय प्रजातीची सर्व गुरे पशुपालकाच्या ठिकाणापासून त्या क्षेत्रा बाहेर ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच गोवर्गीय पशुधनाची वाहतुक, बाजार भरविणे, प्रदर्शन, शर्यती, इत्यादी बाबीस मनाई करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी सर्व पशुपालक, ग्राम पंचायत, नगर पंचायत व नगर परिषद यांना त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये गोवर्ग पशुधनाचे नियमित निरिक्षण करून बाधीत पशुधनाची काळजी, किटकनाशक फवारणी , इत्यादी कार्यक्रम मोहिम स्वरूपात  राबविण्यासाठी पशुसवंर्धन विभागाचे आवश्यक सहकार्य घ्यावे. सदर रोग नियंत्रणासाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या आदेशाचे पालन करून पशुपालक व सर्व संबधितांनी सहकार्य करावे असे अवाहन  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद  व पशुसंवर्धन विभाग उस्मानाबाद यांनी केले आहे.


 
Top