धाराशिव (प्रतिनिधी) - लोहारा (बु) नगर पंचायतच्या हद्दीत बोगस गुंठेवारी करून देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नगरसेवक प्रशांत बब्रुवान काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.29 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
लोहारा (बु) नगर पंचायतच्या हद्दीतील जमीन सर्वे नंबर 175/1, 120/1, 154 3 पोट हिस्से, 157 व 258/1 या जमिनीवर गुंठेवारी व एन ए ले आऊट शासनाच्या नियमानुसार करण्यात आलेली नाही. तसेच या परिसरात रस्ते, नाली व लाईट यापैकी कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. कोणत्याही सुविधा नसताना याची विक्री करताना कागदोपत्री सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे दाखविण्यात आलेले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयास असमाधानकारक दिशाभूल करून फसवणुकीच्या हेतूने खोटा अहवाल सादर केला आहे. मुख्याधिकारी नगरपंचायत कारल्याने दिलेला हा अहवाल अतिशय चुकीचा असल्यामुळे शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीमार्फत त्रिसदस्यीय समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी. तसेच शासनाचे नुकसान करणाऱ्या संबंधितावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी प्रशांत काळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.