नळदुर्ग (प्रतिनिधी)- राष्ट्रीय महामार्ग 652 हा विषय न्यायप्रविष्ट असताना राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापुर यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात दि.17 सप्टेंबर 2023 मराठवाडा मुक्ती दिनारोजी सकाळी 10 वा नळदुर्ग येथील ऐतिहासिक अलियाबाद पुल येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रीय महामार्ग क्र.652 नळदुर्ग-.अक्कलकोट शेतकरी संघर्ष समितीने नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,राष्ट्रीय महामार्ग क्र.652 अक्कलकोट हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात न्यायप्रविष्ठ विषय असताना तसेच शेतकऱ्यांनी रीतसर मार्गाने न्याय मागणी केलेली असताना चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांना नाहक बदनाम करून शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या जमिनी बळकावुन राष्ट्रीय महामार्ग विभाग सोलापुर यांनी संदर्भ रस्त्याला दि.20/3/2019 अंतरीम स्थगिती दिलेली असतांना शेतकऱ्यांच्या जमिनी,शेतकऱ्यांच्या संमती घेत असताना माती टाकुन देणे, विहीर मारून देतो, स्लॅब टाकुन देतो अशा प्रकारचे अमिष दाखवुन रस्त्याचे काम रातोरात करीत असताना संबंधित कंपनी त्यांच्या वाहनामध्ये ओव्हरलोड प्रमाणात वाहतुक करीत असल्याने रस्ता खराब झाला आहे.मात्र केवळ शेतकऱ्यांनी रस्ता अडविल्याचे जाणीवपुर्वक गावकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवुन शेतकरी व गावकऱ्यांमध्ये वाद घडवुन आणण्याचा प्रयत्न कांही मंडळी करीत आहेत.
सध्या हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात न्यायप्रविष्ट असल्याने शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय रस्त्याचे काम करू नये.शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रस्त्याचे काम केल्यास दि.17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती आंदोलन दिनारोजी सकाळी 10 वा. आम्ही निवेदनावर स्वाक्षरी करणारे समस्त बाधित शेतकरी नळदुर्ग येथील ऐतिहासिक अलियाबाद पुल येथे पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर शेतकरी संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष सरदारसिंग ठाकुर, अध्यक्ष व्यंकट पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब पाटील,उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे,सचिव लक्ष्मण निकम,कोषाध्यक्ष काशिनाथ काळे, प्रसिद्धी प्रमुख संतोष फडतरे,महादेव बिराजदार,बडेसाब कुरेशी,अशोक पाडोळे,प्रतापसिंह ठाकुर, बालाजी ठाकुर,तुकाराम सुरवसे,गणपत सुरवसे, शिवाजी मोरे,पंडीत पाटील, महेश घोडके यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.