उमरगा (प्रतिनिधी)-देवदर्शन करून परतत असताना प्रवासी वाहतुकीच्या सहा आसनी ऑटो रिक्षास भरधाव ट्रकने जोराची धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात ऑटो रिक्षाचालकासह त्याच्या कुटुंबातील चारजणांचा जागीच मृत्यू तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे.

मृतांमध्ये रिक्षाचालक सुनिल महादेव जगदाळे, त्याची पत्नी प्रमिला सुनिल जगदाळे, आई अनुसया महादेव जगदाळे, चालकांची भाची पुजा विजय जाधव यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये गीता शिवराम जगदाळे (वय 35), अस्मिता शिवराम जगदाळे (वय 11) व एका बालकाचा समावेश आहे.

उमरगा तालुक्यातील सुंदरवाडी येथील सुनिल जगदाळे हे स्वतःच्या मालकीची सहा आसनी रिक्षा (एमएच25, एम 1319) घेवून कुटुंबियांसह देवदर्शनासाठी कर्नाटकातील अमृतकुंड येथे गेले होते. दर्शन करून परत येताना हैदराबाद ते सोलापूर रस्त्यावर तलमोडनजीक दुपारी दोनच्या सुमारास समोरून भरधाव वेगता येणाऱ्या ट्रक चालकाने त्यांच्या ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून, त्यातील चारजणांचा जागीच मृत्यू झाला. मृत सुनिल यांचे कुटुंब मुरूम साखर कारखाना शेजारच्या विठ्ठल मंदिराचे पुजारी होते.


 
Top