धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील स्वच्छतेबाबत येणाऱ्या तक्रारीबाबत नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रभागांमध्ये शिबिरे घेऊन तेथील नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र त्या शिबिराची माहिती नागरिकांना होत नाही. त्यामुळे त्याची योग्य प्रसिद्धी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.23 ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नगर पालिका प्रशासानाने शहरामधील प्रत्येक प्रभागांमध्ये शिबीर घेऊन तेथील नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्याचे निरासन करून अहवाल देण्यात यावा. तसेच ज्या प्रभागात शिबीर आहे. त्या प्रभागातील नागरिकांना शिबिराची माहिती नगर पालिका स्तरावर देण्यात यावी असे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी दिले असताना दि.22 ऑगस्टपासून दि.22 ऑगस्ट रोजी प्रभाग क्र. 1 मध्ये जरिया लॉस (गालिब नगर) या ठिकाणी या शिबीराचा प्रारंभ करण्यात आला. मात्र तेथील बहुतांश नागरिकांना याची माहिती नव्हती. त्यामुळे याबाबत प्रसिद्धी विषयी नगर पालिका प्रशासनास विचारणी केली असता नगर पालिका प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बोट दाखविण्याचे काम केले. मात्र शिबिराची योग्य ती प्रसिद्धी केली नाही. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी योग्य प्रकारे केली नाही. त्यामुळे या पुढील प्रभागाची शिबिराची प्रसिद्धी नगर पालिकेने योग्य प्रकारे करावी. तसेच या शिबिराची माहिती जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहचेल या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नगरज्ञपालिका प्रशासनास आदेश देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, बाबा मुजावर, अय्याज शेख, वाजिद पठाण, कुणाल निंबाळकर, पृथ्वीराज चिलवंत, रणवीर इंगळे, अतुल आदमाने, पंकज भोसले, जयंती देशमुख, ॲड योगेश सोन्ने पाटील, असलम मुजावर, हेमंत मोरे, अजिंक्य हिबारे, सुरज वडवले व अमरसिंह देशमुख यांच्या सह्या आहेत.