धाराशिव (प्रतिनिधी) -तुळजापूर येथे केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर निर्यात कर (एक्सपोर्ट ड्युटी) वाढविण्याचे निषेधार्थ आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वतीने केंद्र शासनाच्या या धोरणाचा निषेध करून निर्यात कर वाढविण्याच्या अध्यादेशाची होळी करण्यात आली. कांदा पिकाच्या निर्यातीवर केंद्र सरकारकडून 40% पेक्षा जास्त निर्यात कर वाढविण्यात आला आहे . यानिर्णयाच्या निषेधार्थ देशभरात शेतकऱ्यांकडून निषेध करण्यात येत आहे. अतिवृष्टी, दुष्काळ आदी समस्याशी झुंजणारा शेतकरी कधीतरी शेती मालाला चांगला भाव मिळेल या अपेक्षाने कष्ट करत राहतो. या वेळी
धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केंद्र सरकारच्या या धोरणावर टीका करत असताना केंद्र सरकारने पाम तेलाची आयात करून सोयाबीनचे दर कमी केले तसेच टोमॅटो ला चांगला बाजार भाव मिळत असताना नेपाळमधून टोमॅटोचे आयात करून स्थानिक शेतकऱ्यांना टोमॅटोचे बाजार मूल्य चांगले मिळत होते. टोमॅटोची आयात सुरू केल्याने शेतकऱ्यांचे टोमॅटोचे दर निम्या किमतीपर्यंत खाली घसरले आहेत. केंद्र सरकार हे केवळ 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महागाई कमी केली असल्याचे ढोंग करत आहे. केंद्र सरकारला महागाई कमी करायचीच आहे तर पेट्रोल, डिझेल, गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी न करता केवळ शेतकऱ्यांच्या उत्पादनावर केंद्र सरकारची वक्रदृष्टी असल्याचे म्हटले आहे.
कांदा निर्यातीतुन भारताला मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन मिळते. चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तान, आदी देशातून कांदा निर्यात मोठया प्रमाणत होत असून भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याचे कंटेनर जे.एन.पी.टी. बंदरात सध्या स्थितीत थांबवण्यात आलेले आहेत अशातच सरकारद्वारे शेतकऱ्यांचा कांदा दोन लाख टन खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे. 2 लाख टन कांदा म्हणजे एकूण उत्पन्नाच्या 0.6% होतो“ बाकी 99.4% (298 लाख टन) कांद्याचं करायचं काय? एकट्या धाराशिव जिल्ह्यात एका हंगामात 1 लाख टनापेक्षा जास्त उत्पादित होतो. कांदा निर्यातीसाठी बंदरावर गेला तेंव्हा शेतकऱ्याला समजलं की निर्यात शुल्क वाढलं आहे, कंटेनर पुढे सरकू शकले नाही. परिणामी 200 कंटेनर मधील 4 हजार टन कांदा आज जे.एन.पी.टी. बंदरात सडतोय. हे पाप कोणी केलं? असा सवाल खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केला.
तुळजापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसह खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष तथा सहसंपर्क प्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, जगन्नाथ गवळी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, प्रदीप घोणे, अक्षय ढोबळे, प्रतीक रोचकरी, प्रदीप मगर, श्याम पवार, सुनील जाधव, सरदारसिंग ठाकूर, चेतन बंडगर, संतोष बुडाले, बापू नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे, अर्जुन साळुंके, अमीर शेख, समाधान ढवळे, सिद्धराम कारभारी आदीसह तालुक्यातील सर्व पदाधिकारी,शिवसैनिक, शेतकरी बांधव उपस्थित होते.
