धाराशिव (प्रतिनिधी) - ग्रामीण भागासह शहरी भागातील ही अनेक महिलांना वाव मिळत नाही. त्यामुळे महिलांसाठी बाईपण भारी हा चित्रपट जिल्ह्यात दाखविण्यात आला. त्यावेळी अनेक महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे येत्या 29 ऑगस्ट रोजी मंगळागौरी स्पर्धा आयोजित केल्या आहेत अशी माहिती धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
धाराशिव महिला मंडळांच्या मैदानावर होणाऱ्या मंगळागौरी स्पर्धेसाठी 1 लाख रूपयाचे आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. तर महिला संघाला या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी 500 रूपये प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. अर्चना पाटील यांनी सांगितले की, मंगळागौर स्पर्धेतून समाजाला संदेश देण्याचा उपक्रम आम्ही राबवत आहोत. आम्ही राबवत असलेल्या महिलांचा उपक्रम पाहून विरोधक ही महिलांसाठी विविध कार्यक्रम घेत आहेत. आम्ही राबवत असलेल्या महिला उपक्रमाचे हे यश आहे असेही अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी पत्रकारांनी ही निवडणूकीची तयारी आहे का? असे विचारले असता 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना परत एकदा प्रधानमंत्री करण्यासाठी आम्ही नेहमीच विविध कार्यक्रम घेत असतो. त्यामुळे निवडणूकीसाठीच असे कार्यक्रम असतात असे काही नाही. निवडणूकीला तर आम्ही कधीही तयार असतोत असा इशाराही अर्चना पाटील यांनी विरोधकांना दिला.