धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाने भूविकास बँकेच्या सर्व थकीत कर्जदार शेतकरी सभासदांचे संपूर्ण कर्ज माफ केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या. धाराशिव (भूविकास बँक धाराशिशव) च्या संपूर्ण 2082 कर्जदार शेतकऱ्यांचे 6,228 लाख 97 रुपये एवढे कर्ज माफ झाले आहे. या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील कर्जाच्या बोजाची नोंद कमी करण्याचा प्रस्ताव बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक यांनी सादर केला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 6 मार्च 2023 रोजी भूविकास बँकेच्या कर्जाची सातबारा उताऱ्यावरील बोजाची नोंद कमी करण्याबाबत सर्व तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तरी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या सातबारा उताऱ्यावरील भूविकास बँकेच्या कर्जाचा बोजा निरस्त करण्यासाठी संबंधित तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन बँकेचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सुनील शिरापूरकर यांनी केले आहे.