धाराशिव दि.29 (प्रतिनिधी) - शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील नैसर्गिक मोकळ्या नाल्यावर केलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने धाराशिव (उस्मानाबाद) नगरपरिषद प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे कोर्ट आदेशाप्रमाणे  अतिक्रमण तात्काळ काढावीत व या भागातील रोड नाल्या चार आठवड्यांत करा असा आदेश दिला तो न पाळल्यास  न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी पुन्हा न्यायालयात संबंधित प्रशासानाविरोधात  जाणार असल्याचा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) चे शहर संघटक प्रशांत साळुंके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.29 ऑगस्ट रोजी दिला आहे.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलताना साळुंके म्हणाले की, धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील समस्या गेल्या अनेक दिवसांपासून सोडविण्यासाठी वारंवार आंदोलने केली. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे त्या समस्या सुटल्या नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत होते. नागरिकांना सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मी याचिका दाखल केली होती. हा भाग सखल असल्याने येथे असलेल्या पाणी  नैसर्गिक नाल्यावर अनेकांनी अतिक्रमणे करून  पाणी अडवले आहेत. त्यामुळे गालिब नगर, सुलतानपुरा व मिली कॉलनी या भागातील नागरिकांच्या घरात पावसाच्या दिवसात पाणी जाऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येत होते. या नैसर्गिक नाल्यावर असलेली सर्व अतिक्रमणे 4 आठवड्यात काढून हा नाला मोकळा करण्यात यावा, व या भागातील रोड नाल्या साफसफाई करावी असे आदेश धाराशिव (उस्मानाबाद) नगर परिषद प्रशासनाला दिलेले आहेत. तसेच शहरातील कचरा उचलण्यासाठी ज्या ठेकेदारास निविदा दिलेली आहे. त्या ठेकेदाराने एका प्रभागात स्वच्छतेसाठी 12 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्या कर्मचाऱ्यांना हॅन्ड ग्लोज व ड्रेस कोड पुरविणे आवश्यक आहे. मात्र ठेकेदाराने केवळ दोन कर्मचारी नियुक्त केले असून कुठल्याही सुविधा दिलेल्या नाहीत. त्यामुळे या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा त्यांनी सांगितले.


 
Top