धाराशिव (प्रतिनिधी)-आज वय वर्षे 58 गाठलेल्या शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी 43 वर्षांनी एकत्र येत शहरातील सिध्दाई मंगल कार्यालयात स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी जुन्या मित्र-मैत्रिणींनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देवून गुरूजनांचा सन्मान केला.
शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमधील 1979-80 या वर्षातील दहावीच्या वर्गमित्र, मैत्रिणींना एकत्र आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. राज्यात नोकरी व व्यवसायानिमित्त गेलेल्या सर्व वर्गमित्रांना संपर्क करून शहरातील सिध्दाई मंगल कार्यालयात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 43 वर्षांनी वर्गमित्र, मैत्रिणींनी गुरूजन व जुन्या वर्गमित्र-मैत्रिणींना पाहून जुन्या आठवणी ताज्या केल्या. दिवंगत गुरूजनांना स्नेहमेळाव्यात अभिवादन करण्यात आले.
यावेळी हायस्कूलचे माजी विद्यार्थी, संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील, मुख्याध्यापक देशमुख यांनी माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शाळेला भेट दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी संजय मंत्री, चंदू गार्डे, अशोक शर्मा, अॅड. सतीश झिंगाडे, अनिल आहेर, अभय हंबीरे, संजय पाटील दूधगावकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमात सेवानिवृत्त शिक्षक पडवळ गुरूजी, जगताप गुरूजी, एस. व्ही. देशमुख गुरूजी, सुरवसे गुरूजी, गाढवे गुरूजी, नूतन प्राथमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अंबुरे गुरूजी या गुरुजणांचा माजी विद्यार्थ्यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. त्यानंतर श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या जुन्या इमारतीला भेट देवून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.