धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव 25 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे.
मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतीचा समावेश असतो.धान्य व कडधान्ये यांच्यानंतर मानवी आहारात प्रमुख घटक म्हणजे भाजी. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. विविध गुणधर्माने रानभाज्या परिपूर्ण असतात.त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतात. रानभाज्या व रानफळांमध्ये करटुले, तोंडली, हादगा, कुंजीर, चिघळ, तांदुळाजा, लसूणघास, कुरडू, पाथरी, कढीपत्ता, आघाडा, अंबाडी, बांबू, केना, आळूचे पान, उंबर, पिंपळ, शेवगा, कपाळफुटी, गुळवेल, कोरफड, काशीद, फांजी, वासनवेल, काटेमाठ, सराटा, ओवापान व कवठ ह्या रानभाज्या जिल्ह्यात आढळून येतात. ह्या वनस्पती, फळे व रानभाज्या शेतकऱ्यांनी शोधून काढून जपल्या आहे.
रानभाज्यांपासून विविध पदार्थ बनविण्यात येतात.भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून वरण-भजी आदि खाद्यपदार्थ यापासून तयार केले जातात.विविध रानभाज्या ह्या मधुमेह, पोटदुखी व खोकला आदींवरही औषधी म्हणून उपयुक्त ठरल्या आहे.
रानभाज्यांबाबत शहरातील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. या रानभाज्यांची ओळख आस्वाद आणि त्यांचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांकरिता उस्मानाबाद येथे 25 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन आत्मा आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने भेट देऊन आरोग्यकारक, निसर्गस्नेही व पर्यावरणपोषक जैवविविधतेच्या या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक रवींद्र माने यांनी केले आहे.