धाराशिव (प्रतिनिधी) - सध्या जिल्ह्यात गेल्या 25 ते 30 दिवसापासुन कुठेही पाऊस झालेला नाही, मात्र अडीच मिलीमीटरच्या पावसाची नोंद झाल्यास पुन्हा पहिल्यापासुन दिवसाचे मोजमाफ करण्याचा निकष शेतकऱ्यांना अडीचणीचा ठरत आहे. कंपनीच्या फायद्याचे असे निकष ठरविल्याने विमा कंपनी मालामाल तर शेतकरी संकटात अशी स्थिती दिसत आहे. त्यामुळे पावसाचे निकष न ठेवता पिकांच्या परिस्थितीचे सर्वेक्षण करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी आमदार कैलास पाटील यानी केली आहे.
तसेच विमा कंपनीबरोबरच आता राज्य सरकारने देखील एनडीआरएफच्या निकषानुसार पंचनामे करण्याची गरज देखील त्यानी व्यक्त केली आहे. धाराशिव जिल्ह्यात पाच लाख 49 हजार 949 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सोयाबीन पिकाची चार लाख 73 हजार 841 हेक्टरवर पेरा असुन 22 ऑगस्ट अखेर 278.6 मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. सरासरीच्या तुलनेत ते 74.6 टक्के आहे. जिल्ह्यात जूनमध्ये 33.6 मिमी (26.5टक्के) जुलैमध्ये झालेल्या पावसावर पेरणी झाली. ऑगस्टमध्ये 22 तारखेपर्यंत फक्त 17 मिमी म्हणजे 15 टक्के पाऊस झाला आहे. सोयाबीन फुलोरा अवस्थेत असून पावसाच्या खंडामुळे फुलगळ होऊन नुकसान झाले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करताना मंडळ निवडण्याच्या निकषांत 21 दिवस व त्यापेक्षा जास्त पावसाचा खंड, सरासरीच्या 50 टक्केपेक्षा कमी पाऊस असे निकष आहेत. ऑगस्ट महिन्यात सर्वच मंडळामध्ये पाऊस पडलेला नाही, परंतु केंद्राच्या विमा कंपनी धार्जिण मार्गदर्शक सुचनेनुसार एका दिवसामध्ये अडीच मिमी पाऊस पडल्यास पावसाचा दिवस गृहीत धरला जातो. पावसाचा खंड मध्येच संपतो.
22 ऑगस्टपर्यंत फक्त 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड असलेली 57 पैकी 31 मंडळे आहेत. सर्व मंडळामध्ये ऑगस्टमध्ये 22 तारखेपर्यंत कुठेही पाऊस झालेला नाही, तरीही अडीच मिमी पावसाच्या निकषानुसार इतर मंडळे वगळली आहेत. अडीच मिमी पावसाने जमिनीत ओलावा येत नाही. पिकस्थितीत कसलीही सुधारणा होत नाही. मंडळातील पर्जन्यमापकाच्या ठिकाणी पावसाची नोंद झाली की, मंडळातील इतर गावामध्ये पाऊस पडला नसला तरी सर्वदूर पाऊस झाला असा निष्कर्ष काढला जातो हे अन्यायकारक आहे. अशी मंडळेच वगळण्यात येत असुन आकड्यांच्या आधारे पिकांचे नुकसान न ठरवता पिक परिस्थिती पाहून नुकसान ठरविण्याची मागणी आमदार कैलास पाटील यानी केली आहे.