धाराशिव (प्रतिनिधी)-लेडीज क्लब धाराशिवच्या वतीने लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सध्या गाजत असलेला केदार शिंदे दिग्दर्शित ’बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट जवाहर टॉकीज, तुळजापूर आणि ताजमहल टॉकीज, धाराशिव येथे महिलांना मोफत दाखवण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
लेडीज क्लबच्या वतीने वर्षभर महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असुन महिलांमध्ये सध्या ’बाईपण भारी देवा’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. अनेक महिलांची इच्छा असून देखील हा चित्रपट पाहण्याची त्यांना संधी मिळत नाही. याच अनुषंगाने खास महिलांसाठी लेडीज क्लबच्या वतीने दि. 29 व 30 जुलै 2023 रोजी तुळजापूर तालुक्यातील महिलांसाठी जवाहर टॉकीज, तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील महिलांसाठी ताजमहल टॉकीज, धाराशिव येथे दु. 12 ते 3, 3 ते 6 आणि सायंकाळी 6 ते 9 असे दोन दिवस तीन शो मोफत दाखवण्यात येणार आहेत.
तरी तुळजापूर व धाराशिव तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन लेडीज क्लब, धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.