धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांना शासनाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्याला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस नाईक लाडाप्पा चिक्काळे यांनी त्यांच्या नावे आळणी शिवारात असलेली 33 गुंठे म्हणजेच तब्बल एक एकर जमीन तृतीयपंथीयांसाठी दान दिली आहे. ही जागा तृतीयपंथीयांसाठी निवासस्थाने अथवा इतर प्रायोजनासाठी वापरता येणार आहे.
तृतीयपंथी हे समाजाचाच एक घटक असल्याने त्यांच्याकरिता काहीतरी करावे या हेतूने पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस नाईक लाडाप्पा चिक्काळे यांनी आळणी शिवारात त्यांच्या नावे असलेली 33 गुंठे जमीन दान दिली आहे. यावेळी तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे, आळणी ग्रामपंचायतचे सरपंच प्रमोद वीर, ग्रामसेवक तसेच तृतीयपंथीयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या जागेचा तृतीयपंथीयांकरिता निवासस्थान, वस्ती वा इतर प्रायोजनासाठी वापर करण्यात येणार आहे. तृतीयपंथी बांधवांना हक्काची जागा मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.