धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. या लढ्यात धाराशिव जिल्ह्याने दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. सरकार छत्रपती संभाजीनगर येथे यानिमित्त स्मारक निर्माण करणार आहे. त्याचे स्वागतच मात्र, धाराशिवचा धगधगता इतिहास लक्षात घेता येथेही स्मारक व्हावे, अशी आग्रही मागणी करतानाच या भागात केंद्रीय विद्यापीठ, औद्योगिकरणाची गरजही आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी बुधवारी विधानसभेत अधोरेखित केली.

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अभिवादन प्रस्तावावर बोलताना आ. पाटील म्हणाले, सुमारे 224 वर्षे मराठवाडा निजाम राजवटीमध्ये होता. मराठवाड्यातील जनतेने रझाकाराचे अनन्वित अत्याचार सहन केले. आर्य समाज, हिंदु महासभा व राज्य कँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली स्थानिकांनी सत्याग्रहासह सशस्त्र लढा देखील दिला. धाराशिव जिल्ह्यातील प्रखर विरोध पाहून चवताळलेल्या रझाकारांनी चिलवडी, नंदगाव, देवधानोरा ही गावे जाळली. स्थानिकांनी सशस्त्र लढा उभारला होता. सरदार वल्लभाई पटेल यांनी पोलीस क्शनचा निर्णय घेतला तेव्हा नळदुर्गनजीक मोठी सैन्य कारवाई झाली. या लढ्यात शीख बटालियनचे हवालदार बचित्तरसिंग यांना हौतात्म्य आले. त्यांनी दाखवलेले अधम्य धाडस, शौर्य व दिलेल्या सर्वोच्च बलिदानामुळे त्यांना सैन्य दलाचा सर्वोच्च बहुमान अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. स्वतंत्र भारताचे ते पहिले अशोक चक्र विजेते आहेत. मुक्तीसंग्रामाच्या लढ्यातील हा धाराशिवचा धगधगता इतिहास जागविण्यासाठी येथेही एक स्मारक सरकारने निर्माण करावे, अशी आग्रही मागणी आ. पाटील यांनी केली. तसेच ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भास्करराव नायगावकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रातील काही भाग सभागृहात वाचून दाखविला.


 
Top