पुणे (प्रतिनिधी)- संत चोखामेळा अध्यासन केंद्र पुणे व वृंदावन फाऊंडेशन आयोजित संत चोखामेळा साहित्य संमेलन 2023 अनुषंगाने संबंधित सहयोगी संस्थाची बैठक संत तुकाराम अध्यासन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या अध्यक्ष आदरणीय प्राचार्या उल्काताई धावारे चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनात व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम - संत ज्ञानेश्वर - संत नामदेव अध्यासनाचे समन्वयक प्रो. डॉ. ओम श्रीश दत्तोपासक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत संत चोखामेळा महाराज व परिवारातील संताच्या साहित्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी संत चोखामेळा साहित्य संमेलन घेण्यासंदर्भात चर्चा होऊन पुण्यभूमी आळंदी या ठीकाणी हे साहित्य संमेलन घेण्याचे नियोजित करण्यात आले. या साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक, संत चोखामेळा व परिवारातील संताच्या अभंगाचे संशोधक चरित्रलेखक मा. प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी (मंगळवेढा) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्राचार्य डॉ. अप्पासाहेब पुजारी यांनी संत चोखामेळा यांच्या दुर्मीळ अभंगाचे संपादन केले असून या साहित्याचा प्रदीर्घ अभ्यास केला आहे. हे दोन दिवसीय साहित्य संमेलन एकूण सहा सत्रात विभागून होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंतांच्या उपस्थितीत आळंदी येथे 18 व 19 नोव्हेंबरला संपन्न होणार आहे. 

या साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, संत साहीत्य प्रदर्शन, उद्बबोधन व संत साहित्याचे देखावे असणार आहेत. तसेच ’संत चोखामेळा व सोयराबाई यांच्या साहित्यातील श्री विठ्ठलभक्ती ’असा मध्यवर्ती आशय घेउन विशेष अंक ही प्रकाशित करण्यात येइल. याप्रसंगी संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, प्रो. डॉ.ओम श्रीश दत्तोपासक, प्राचार्य डॉ आप्पासाहेब पुजारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. माणिकराव सोनवणे, महाराष्ट्र शासनाच्या  महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीचे सदस्य अॅड. प्रणव पाटील, कवयित्री अलका सपकाळ, वृंदावन फाऊंडेशन समन्वयक वल्लभ केनवडेकर, प्रा. विनोद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. डॉ. अप्पासाहेब पुजारी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे, देहू, आळंदी, पंढरपूर, मंगळवेढा, धाराशिव व परिसरातून मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे.

या संत साहित्य संमेलनाला उपस्थित राहावे असे आवाहन संत साहित्य संमेलनाचे निमंत्रक प्रा. सोमनाथ लांडगे यांनी केले आहे.


 
Top