धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर औसा महामार्गावरील काक्रंबा येथील ब्रिजचे 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत काम पूर्ण न झाल्यास तुळजापूर औसा महामार्गावरील टोल बंदी करण्यात येईल अशी सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर यांना करून संबंधित पुलाचे काम ठेकेदार कंपनीकडून वेळेत करण्याबाबत सांगण्यात आले. तसेच सोलापूर- धुळे महामार्गावर धाराशिव शहरानजीकची साईड रोडची अपूर्ण कामे 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत पूर्ण न केल्यास येडशी येथील टोल प्लाजा बंद करणार असल्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांना आढावा बैठकीदरम्यान ठणकावून सांगितले. 

धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वम दिशा समितीची आढावा बैठक ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता आदींची उपस्थिती होती.

जिल्ह्यातील प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मंजूर करण्यात आलेली कामे वेळेत पूर्ण करावीत.राष्ट्रीय पेयजल योजनेमध्ये ग्रामीण भागातील वाड्या तसेच वस्त्यांचा समावेश करण्यात यावा. शहरी व ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन करण्याचे निर्देश खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले.

शेतरस्ते पूर्ण करण्याबाबतही  खा. राजेनिंबाळकर यांनी सुचना केली. संजय गांधी निराधार योजना तसेच वृद्ध लोकांचे निवृत्ती वेतन अनेक महिन्यापासून वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सदर प्रकरणांमध्ये लक्ष घालून निराधार, निराश्रित विधवा, एकल महिला यांचे वेतन वेळेत जमा करण्याबाबत संबंधीत विभागास सूचना करण्यात आल्या.

उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर  रेल्वेमार्गासाठी जी जमीन शेतकर्‍यांकडून अधिग्रहण केली जात आहे. त्या अनुषंगाने जमिनीचा मावेजा हा थेट जमीन खरेदी करून देणेबाबत सूचना करण्यात आल्या. 

सन 2021- 22 हंगामातील उर्वरित पीक विमा मिळवून देणे करिता संबंधित विमा कंपनीवर कारवाई करण्याबाबत कृषी विभागास सूचना करण्यात आले त्यानंतर सदर दिशा बैठकीस गैरहजर असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करणार असल्याचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बैठकीदरम्यान सांगितले.


 
Top