धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल 25 घरफोड्या करणार्‍या मोस्ट वॉन्टेड आरोपीला अटक केली असुन त्याच्याकडून जवळपास विविध गुन्ह्यात चोरीला गेलेले 9 लाख रुपये किमतीचे 23 तोळे सोने हस्तगत केले आहे. तर गाड्यांची चोरी करणार्‍या 2 आरोपीना अटक करुन चोरीला गेलेल्या गाड्या जप्त केल्या. पोलिसांनी राबविलेल्या ऑल आऊट ऑपेरेशनचे हे मोठे यश आहे.

कधी फ़ॉरेस्ट ऑफिसर, कधी कृषी अधिकारी तर रात्री मुक्काम शेतकरी म्हणून शेतात अश्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून पोलिसांनी गावात रेकी केली. लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी गावकरी यांच्याशी संवाद साधला लोकांना संशय येऊ नये यासाठी नवीन स्कीम, कारणे असे वेगवेगळे रूप घेऊन नावे बदलून वेशांतर करीत अखेर आरोपीला मुद्देमालासह रंगेहात अटक केली. तीन जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या आरोपीच्या मागावर होते मात्र धाराशिव पोलिसांना हे मोठे यश आले. लातूर, सोलापूर, बीड या जिल्ह्यात हा आरोपी जवळपास 30 ते 40 गुन्ह्यात हवा आहे.त्यामुळे आगामी काळात अनेक गुन्हे व मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, एम रमेश उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे तपास करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, जगदीश राऊत, सहायक पोलिस निरीक्षक मनोज निलंगेकर, पीएसआय संदीप ओव्हाळ, वली उल्ला काझी, शौकत पठाण, प्रकाश औताडे, विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, जावेद काझी, शैला टेळे मुजीब पठाण, साईनाथ आशमोड, पांडुरंग सावंत, योगेश कोळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील आळंद व धाराशिव शहरात काही ठिकाणी ते गाडी तोडफोड करुन स्क्रॅप भंगार मध्ये विकत होते तर घरफोडी करणारा आरोपी हा सोने लुटायचा.


 
Top