धाराशिव (प्रतिनिधी)-कळंबच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी परांड्यात अवैध कत्तलखान्यावर धाडसी कारवाई करत 940 किलो गोवंश मांस तसेच टेम्पो, पिकअप, मोटरसायकल आदी सुमारे 17 लाखाचे साहित्य जप्त केले. शुक्रवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा हददीत अवैध व्यवसायाची माहिती काढुन सहायक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास परांड्यातील कसबा गल्ली दर्गा रोड येथील महंमद हुसेन कुरेशी यांच्या मालकीच्या घराच्या बाजुला कंपाउडमध्ये पत्र्याच्या बंद गेटमध्ये सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला. या कारवाईमध्ये कळंब उपविभागाचे पथक व कळंबचे पोलीस, येरमाळा पोलीस, पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचा समावेश होता.
कसबा गल्ली दर्गा रोड परंडा येथील महंमद हुसेन कुरेशी यांच्या मालकीच्या घराच्या बाजुला कंपाउडमध्ये पत्र्याच्या बंद गेटमध्ये अवैधरित्या कत्तलखान्यात 940 किलो गोवंश मांस किंमत 2 लाख 6 हजार 800 रुपये, पिकअप, 2 टमटम, 1 मोटार सायकल अशी 5 वाहने किंमत 14 लाख 5 हजार रुपये, 7 गोवंश जनावरे, वजन काटे, सुर्या आदी एकूण 17 लाख 42 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला. पोलिसांनी साहित्य जप्त करून जागा मालक महंमद हुसेन कुरेशी, आलिशान हरुन कुरेशी, नवाज खाजा कुरेशी (रा. परंडा) व 2 अज्ञात इसम अशा एकुण 5 जणांविरुध्द परांडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कामगिरीमध्ये एम. रमेश यांच्यासह पुजरवाड, चाटे, सादीक शेख, कांबळे, नवनाथ खांडेकर, शाहरुकखा पठाण, श्रीकांत भांगे, विक्रम पतंगे, अमोल जाधव, रवि कोरे, कमलाकर सुरवसे, गुळमे, खाडे, गायकवाड यांनी सहभाग घेतला.