धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपा महिला मोर्चा धाराशिवच्या माजी जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे यांनी हैद्राबाद येथे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या हस्ते भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला. अंबुरे यांनी या अगोदर जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती त्यानंतर त्यांनी भाजपा महिला मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्ष पदावर यशस्वीपणे कार्य केले. या पदावर कार्यरत असताना त्यांनी विविध सामाजिक व विशेषतः महिलांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवून न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांनी केलेला तेलंगणाचा सर्वांगिण विकास व त्यांच्याकडे असलेली विकासाची दूरदृष्टी तसेच त्यांची कन्या, भारत राष्ट्र समितीच्या नेत्या के कविता यांनी मागील दोन महिन्यांपूर्वीच महिला दिनाचे औचित्य साधुन, दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर महिला आरक्षण विधेयकासाठी दोन दिवसीय आक्रमक असे आंदोलन केले होते.

महिलांच्या राजकिय हक्कांसाठी लढणारी एकमेव महिला म्हणून के कविता यांच्या कार्यावर प्रेरित होवुन भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला असुन आपण सपूर्ण महाराष्ट्रात हा पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अर्चना अंबुरे यांनी सांगितले.


 
Top