तुळजापूर (प्रतिनिधी)- मृग नक्षञ निघुन आज आठ दिवस होत आला तरीही वरुनराज्याचे दर्शन होत नसल्याने तालुक्यात आज पर्यत शुन्य टक्के पेरणी झाली असुन तात्काळ पाऊस न पडल्यास खरीप पेरणीत मोठी घट होवुन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. 

तुळजापूर तालुक्याचे एकूण पेरणी क्षेत्र 87 हजार हेक्टर असुन त्यापैकी खरीपचे 85 हजार हेक्टर व रबीचे 45 हजार हेक्टर आहे. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने रबीसाठी ठेवलेल्या क्षेत्रात ही खरीप पेरणी झाल्याने 120 टक्के एवढी विक्रमी पेरणी झाली होती. यंदा पाऊस तात्काळ सुरु झाला तर  शंभर टक्के पेरणी होवु शकते लांबला तर माञ शंभर टक्के आत पेरणी होण्याची शक्यता आहे. पाऊस लांबल्याने तुरी पेरणी क्षेत्रात मोठी घट होणार आहे. 

सध्या पाऊस लांबल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. सध्या तालुक्यातील बळीराजाच्या नजरा या नभा (आकाशा) कडे लागल्या असून, शेतकरी वरुन राज्याची प्रतिक्षा करताना दिसत आहे,. काळ्या आईची ओटी भरण्यासाठी शेतकरी वर्गाने उसानेपासने करुन कर्ज काढुन बी-बियाणे, खते आणुन पेरणी साठी सज्ज झाला आहे. तालुक्यातील शेतकरी खरीपाची मशागत पूर्ण करून आता पावसाची वाट पाहताना दिसतोय. कारण हवामान अंदाजानुसार सध्या मान्सून केरळ मध्ये दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास कसा असणार यावर सर्व काही परस्थिती अवलंबून असते. कधी एकदा तालुक्यात दमदार पाऊस होईल आणि कधी एकदा खरीपाच्या पेरणीला सुरुवात करू अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. 


 
Top