धाराशिव (प्रतिनिधी)-ढोकी पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या वाखरवाडी येथे परजिल्ह्यातील 11 मजुरांना आणून त्यांच्याकडून बळजबरीने विहिरीचे काम करून घेतले होते. तसेच हे मजूर पळून जावू नये म्हणून रात्री साखळदंडाने बांधले जात होते. गुलाम झालेल्या 11 मजुरांची ढोकी पोलिसांनी सुटका करून एका ठेकेदारासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
दि. 17 जून रोजी पोलिस स्टेशन ढोकी येथे माहिती प्राप्त झाली की, मौजे वाखरवाडी ता. जि. धाराशिव येथे संदिप रामकिसन घुकसे वय 23 वर्षे रा. कवठा ता. सेनगाव जि. हिंगोली रास बळजबरीने पकडून ठेवून याचेकडून दिवसभर विहिरीचे काम करून घेतात अशी माहिती मिळाल्यावरून ती महिती पोलिस अधिक्षक, अपर पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, कळंब यांना देवून त्यांचे मार्गदर्शनखाली सपोनि जगदीश राऊत, पोउपनि बुध्देवार, सपोफौ/816 सातपुते, पोह/48 शेळके, पोना/1871 क्षिरसागर, पोना/1760 तरटे, पोकॉ/916 शिंदे, पोकॉ/188 शिंदे, पोकॉ/529 गोडगे असे पथक तयार करण्यात आले होते.
सदर पथकाने मिळालेल्या बातमी ठिकाणी जावून शोध घेतला असता याठिकाणी भगवान अशोक घुकसे वय 26 वर्षे रा. कवठा ता. सेनगाव जि. हिंगोली हा मिळून आला. याचे सोबत इतर 5 इसम यामध्ये मारुती पिराजी जटाळकर, वय 40 वर्षे,रा. आतकुर, ता. धर्माबाद, राजू गनुलाल म्हात्रे, वय 22 वर्षे रा मध्यप्रदेश, मंगेश जनार्दन कानटजे वय 26 वर्षे, रा. कुलमखेड, मा. बुलढाणा, बालाजी शामराव वाघमारे, वय 32 वर्षे, रा.लिंबा, ता. देगलूर जि. नादेंड, गणेश अशोक पवार, वय 30 वर्षे, रा. नाशिक असे मिळून आले आहे. वाखरवाडी येथे मिळून आलेल्या इसमांकडे चौकशी केली असता संदिप रामकिसन घुकसे हा मौजे खामसवाडी येथील विहीरीवर असल्याचे माहिती देवून त्यांना सोबत घेवून चला अशी विनंती केली, त्यावरुन वाखरवाडी येथील मिळून आलेले सहा इसमांना सोबत घेतल्यावर त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता त्यांनी माहिती दिली. की, संतोष शिवाजी जाधव(गुतेदार) व इतर एक हे दिवसा बळजबरीने विहीरीवर आमचेकडून काम करुन घेतात व संध्याकाळी आमचे हाता पायाला पळून जावू नये म्हणून साखळीने ट्रॅक्टरला बांधून ठेवतात अशी माहिती दिली.