नळदुर्ग (प्रतिनिधी) नळदुर्ग परीसरात बोरी नदीच्या पलीकडे मोटे यांच्या शेताजवळ दि. 29 जुन रोजी रात्री साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी दि. 30 जुन रोजी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली आहे.

बिबट्या अमुक गावात दिसला म्हणुन यापुर्वी नळदुर्गकर बातम्या पाहत होते किंवा वाचत होते. मात्र प्रत्यक्षात बिबट्या नळदुर्ग परिसरात येईल याचा कुणीही विचार केला नव्हता. मात्र दि. 29 जुन रोजी अगदी शहरालगत बोरी नदीच्या पलीकडे बिबट्या आल्याची बातमी शहरात पसरली आणि सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. दि. 29 जुन रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बोरी नदीच्या पलीकडे महेश मोटे यांच्या शेतशेजारी राहणार्‍या मुस्लिम कुटुंबातील महिलेला बिबट्या दिसला. या बिबट्याने सर्वप्रथम त्या महिलेवर झडप घातली होती मात्र दैव बलवत्तर म्हणुन त्या बिबट्याच्या तावडीतुन महिला कशी बशी निसटली. मात्र यावेळी बिबट्याने शेळी घेऊन गेली. बिबटया आल्याची माहिती मिळताच शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

दि.30 जुन रोजी वनविभागाचे अधिकारी बी. ए.चौगुले वनपरीक्षेत्र अधिकारी तुळजापुर, एन. बी. घोरपडे वनपाल तुळजापुर, व्ही. एस. पाटील वनरक्षक तुळजापुर, आर. बी. चव्हाण वनरक्षक नळदुर्ग, काशिनाथ शेवाळे वनरक्षक तामलवाडी, शिवाजी पवार, संजय सरडे वनमजुर यांनी या परीसराला भेट देऊन या परीसरात पाहणी केली. वनरक्षक व्ही. एस. पाटील यांनी म्हटले आहे की पिंजरा मागविण्यात आला असून आजच दुपारी तो पिंजरा याठिकाणी लावण्यात येणार आहे. पिंजर्‍यात खाद्य ठेवण्यात येणार असुन  ते खाद्य खाण्यासाठी रात्री बिबट्यासदृश्य प्राणी येणार ते पाहणार आहोत.


 
Top