धाराशिव (प्रतिनिधी)-  प्रथम खेळाडू आणि नंतर प्रशिक्षक या दोन भूमिकेतून प्रशिक्षक जात असतो. खेळाडू असताना तो कसे खेळायचे याचा विचार करतो, तोच प्रशिक्षक खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी मदत करतो. अशा प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजनामुळे तो आपल्या संघाची कामगिरी नक्कीच उंचावणार आहे, असा विश्वास सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला यांनी व्यक्त केला.

दि. 30 जून या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खो-खो दिन निमित्ताने महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या वतीने धाराशिव येथे शुक्रवारी सुरू झालेल्या राज्यातील खो-खो प्रशिक्षकांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते शाहूराजे खोगरे व रहिमान काझी आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत धाराशिव जिल्हा संघटनेचे सचिव प्रविण बागल, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सहसचिव जयांशु पोळ, पवन पाटील व राजेश सोनवणे यांनी केले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस अॅड. गोविंद शर्मा यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव डॉ. प्रशांत इनामदार यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरचिटणीस संदीप तावडे यांनी आभार मानले. 

यावेळी या कार्यशाळेचे समन्वयक शिरीष मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेत  जिल्ह्यातून प्रत्येकी  प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. पहिल्या सत्रात खेळाडूंच्या तत्वज्ञान या विषयावर झालेल्या चर्चासत्रात डॉ. चंद्रजित जाधव, सारिका काळे, डॉ. नरेंद्र कुंदर, राजेंद्र साप्ते, महेश पलांडे यांनी भाग घेतला. याचे समन्वय संदीप तावडे यांनी केले.


 
Top