धाराशिव (प्रतिनिधी) - एक वर्ष लोटले तरी अद्याप सोयाबीन पिक अनुदान, पिक विमा मिळाला नाही, हा पीकविमा त्वरीत मिळावा या मागणीसाठी वैतागलेल्या टाकळी, बेंबळी येथील शेतकरी सतीश कुंभार यांनी सोमवार दि.10 जुलै 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटूंबासहित सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, मौजे टाकळी, बेंबळी, (ता.जि. धाराशिव) येथील शेतकरी सतीश कुंभार यांची मौजे, टाकळी, बेंबळी येथे गट क्रमांक 512 ही जमीन आहे. या जमीनीत सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन एक वर्ष झाले. परंतु त्यांना पुढील पीक घेण्यासाठी तात्काळ पिक कर्ज मिळणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु बेंबळी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा मॅनेजर सुरेश कदम पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच पीक कर्ज देण्याचे शासनाचे आदेश नाहीत, असे सांगून जाणीवपूर्वक अडवणूक करीत आहेत.त्यामुळे वैतागलेले शेतकरी कुंभार अडचणीत सापडले आहेत. कुंभार यांनी पीक कर्ज 10 जुलै पर्यंत न मिळाल्यास सहकुटूंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हाधिकारी व खासदार ओमराजे यांना दिल्या आहेत.