उमरगा (प्रतिनिधी)- ज्या देशात राहतो तेथील कायद्याचे पालन करणे इस्लाम मध्ये बंधनकारक आहे, त्यामुळे आज आषाढी एकादशी असल्याने कोणीही कुर्बानी देवू नये आणि कायद्याने बंदी असलेल्या प्राण्यांची सुद्धा कुरबानी द्देवू नये असे आवाहन मौलाना आयुब शेख यांनी केले आहे. 

उमरगा शहरात बकरी ईद निमित्त गुंजोटी रोड येथील इदगाह मैदानावर सकाळी आठ वाजता सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की आपण भारत देशात राहतो, सगळ्या प्रमाणे आपण पण भाईचारा सांभाळणे बंधनकारक आहे. आपल्या हिंदू बांधवांचा  आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच वेळी आली आहे. आपण ईद साजरी करताना, आनंद व्यक्त करताना हिंदू बांधवांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी आपण घ्यायची आहे. सोशल मीडियावर येणार्‍या कुठ्ल्याही अफवा वर विश्वास ठेवू नये, अशा वादग्रस्त पोस्ट्स पुढे फॉरवर्ड न करण्याची विनंती यावेळी मौलाना आयुब यांनी केली. शहरातील हजारो मुस्लिम बांधव एकत्र येवून नमाज अदा केली व एकमेकांना गळे भेट घेवून शुभेच्छा दिल्या. 


पावसासाठी विशेष दुवा मागण्यात आली

जून महिना संपत आला, अजूनही पावसाने हजेरी न लावल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. तालुक्यांतील पाणीसाठा पण कमी झालेला आहे.  यावर्षी पाऊस वेळेवर नाही झाला तर शेतकरी तर अडचणीत येईलच पण मुके जनावरे, प्राणी, अन्य जीव यांची पण तारांबळ उडेल त्यासाठी लवकरात लवकर पाऊस येवू दे अशी दुवा यावेळी मागण्यात आली.


 
Top