तुळजापूर (प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील संतांची शिकवण माहित व्हावी व सांस्कृतीक परंपरेची अनुभूती देण्यासाठी जि. प. प्राथमिक शाळा पिंपळा ब.ु येथे शालेय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक महादेव वाघमारे व हभप लक्ष्मण चौगुले महाराजांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडी प्रदक्षिणेस सुरुवात झाली. सजवलेल्या पालखीत संतांच्या प्रतिमा, ग्रंथ व शालेय पाठ्यपुस्तके ठेवण्यात आली होती .

विद्यार्थ्यांनी विठ्ठल - रुक्मिणी व विविध संतांच्या वेशभूषा करून दिंडीत सहभाग घेतला. इतर विद्यार्थीही वारकरी वेशभूषेत आले होते. कपाळी गंध, डोक्यावर टोपी, पांढरा पोशाख, गळ्यात टाळ व मुखी हरिनामाचा गजर करत सर्वजण आनंदाने यात सामील झाले. गावातील प्रदक्षिणा मार्गावर घरासमोर सुवासिनीनी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करून पालखीचे दर्शन घेतले. यात अंगणवाडीतील बालके व शिक्षकाही सहभागी झाल्या होत्या. मुलींनी इरकल साड्या नेसून हातात पताका, डोक्यावर तुळस घेऊन उपस्थितांचे लक्ष वेधले .

प्रदक्षिणा मार्गावरील हनुमान मंदिर, हरिबुवा समाधी, राम मंदिर, विठ्ठल मंदिर, महादेव - अंबाबाई मंदिर येथे संताचा महिमा सांगणार्‍या अभंगाचे गायन झाले. सर्वांना आनंदाची विलक्षण अनुभूती देणारा रिंगण सोहळा महादेव मंदिरासमोर पार पडला. यावेळी पताका घेऊन ज्ञानोबा - तुकाराम गजर करत टाळांच्या आवाजात बाल वारकर्‍यांनी विठ्ठलाचा धावा केला. बाल वारकर्‍यांनी वारकरी परंपरेतील फुगडी खेळणे, पाऊल खेळणे याचा मनमुराद आनंद लुटला. संत परंपरेने धार्मिक सहिष्णुता व सर्वधर्म समभाव जपून सामाजिक ऐक्य टिकून तो वाढवण्याचे कार्य केले आहे. आजच्या युगातही संतांची शिकवण सर्वांनी अनुसरावी असे आवाहन यावेळी महादेव वाघमारे यांनी केले. शेवटी शाळेतील प्रांगणात आरती होऊन दिंडीची सांगता झाली.

या कार्यक्रमासाठी महादेव वाघमारे, विठ्ठल नरवडे, राजेंद्र घोरपडे, स्वाती बळे, विशाल कंदले यांनी परिश्रम घेतले. यावेळी हभप लक्ष्मण चौगुले, मारुती पोपळघट, वनिता चौगुले जयश्री जाधव,सुरेखा जाधव, सविता चौगुले, लक्ष्मी चुंगे यांची विशेष उपस्थिती होती.

 
Top