धाराशिव / प्रतिनिधी-

 बाल न्याय मुलांची (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 व एकात्मीक बाल संरक्षण योजने अंतर्गत प्रत्येक गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

 बालकांचे हक्क अबाधीत राखून त्यांच्या सर्वांगीन विकासाला चालणा देणे, बालकांच्या समस्यांची सोडवणूक करणे, बालकांचा विविध योजनांचा समन्वय साधणे, गाव पातळीवरील बालकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या हेतूने महिला व बाल विकास अधिनस्त जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या वतीने ग्राम बाल संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे.

 या समितीमध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, बालक यांचा समावेश असून त्यांना बालकांचे हक्क, समितीचे कार्य आणि जबाबदाऱ्या याबाबत दि. 26 ते 27 एप्रिल 2023 रोजी दोन दिवसीय प्रशिक्षण परंडा येथील पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आले होते.

 ग्राम बाल संरक्षण समितीचे प्रशिक्षण सत्राचे उद्धादन परांड्याचे गट विकास अधिकारी श्री. राजगुरु तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी विनय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रशिक्षणास प्रमुख अतिथी म्हणून सहायक गट विकास अधिकारी ज्ञानेश्वरी गोडसे, कक्ष अधिकारी श्री.रोठोड, बाल विकास प्रकल्पाच्या जेष्ठ मुख्य सेविका श्रीमती मोमीन आणि श्री. खांडे हे होते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून परांडा येथील सामाजिक कार्यकर्ते विकास कुलकर्णी तसेच जिल्हा संरक्षण अधिकारी भुजंग भोसले व परंडा तालुका संरक्षण अधिकारी बापु जबडे हे उपस्थित होते.

 ग्राम बाल संरक्षण समितीचे सक्षमीकरण करणे व बालकांच्या हककांचे संरक्षण करणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उददेश असल्याचे मत अध्यक्षांनी व्यक्त केले. ग्राम बाल संरक्षण समितीची रचना, कर्तव्य व जबाबदाऱ्या याबाबत तज्ञ मार्गदर्शक यांनी मार्गदर्शन केले.

 जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमाण जास्त असून या दृष्टीने उपाययोजना व कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा संरक्षण अधिकारी भुजंग भोसले यांनी व्यक्त केले तसेच महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती जिल्हा संरक्षण अधिकारी श्री. भोसले यांनी सविस्तर सांगितली. या प्रशिक्षणासाठी परांडा तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनिल अंकुश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या दोन्ही सत्रांचे सुत्रसंचालन जिल्हा संरक्षण अधिकारी भुजंग भोसले यांनी केले व आभार प्रदर्शन तालुका संरक्षण अधिकारी बापु जबडे यांनी मांडले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भागयश्री कोळी, सखी वन स्टॉप सेंटरचे सोहम पेठे यांनी परिश्रम घेतले.

 
Top