धाराशिव / प्रतिनिधी-

 जिल्हा पोलीस दल व आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने शनिवारी (दि.6) सकाळी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मोहिमेअंतर्गत नागरिकांनी कचरा कुठेही टाकू नये, आपल्या परिसराची स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी यांनी यावेळी केले.

 जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पोलीस कर्मचार्‍यांच्या वतीने दर शनिवार व रविवारी पोलीस मुख्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. आज शनिवारी शहरातील समर्थनगर येथील श्रीराम मंदिर, स्वामी समर्थ मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मागील परिसरात देखील स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यापुढे शहरातील विविध भागात विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असून नागरिकांनी प्लास्टिक कचरा कुठेही न टाकता त्याचे वर्गीकरण करावे. तसेच आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.कुलकर्णी यांनी यावेळी केले.

या मोहिमेत जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक तसेच नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.


 
Top