धाराशिव / प्रतिनिधी-

 एक महिन्यापेक्षा जास्त प्रलंबित असलेल्या फेरफार निकाली काढण्याच्या अनुषंगाने जिल्हयाभरात मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी भरविण्यात येईल. तेव्हा सर्व संबंधित शेतकऱ्यांनी फेरफार अदालतमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

सर्व सामान्यांचे प्रश्न तातडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार  निकाली काढणे व त्याकरिता मंडळ मुख्यालयी फेरफार अदालत घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार  जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दि.11 मे 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून त्यामध्ये एक महिन्याचे वर प्रलंबित असलेल्या साध्या विवादग्रस्त फेरफरांची संख्या निश्चित करून दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी फेरफार अदालत तहसिल आणि मंडळ स्तरावर आयोजित करण्यात यावी.तसेच महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास त्याच्या लगतच्या दुसऱ्या दिवशी फेरफार अदालत आयोजित करावी असे निर्देश देण्यात आले आहे.

या फेरफार अदालत मोहिमेची मे महिन्याच्या तिसऱ्या मंगळवार दि.16 मे 2023 पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे.जिल्हयातील सर्व तहसिल मुख्यालयी- सर्व मंडळ मुख्यालयी नायब तहसिलदार.मंडळ अधिकारी-अ का यांच्या उपस्थिती सदर फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. 

नोंदणीकृत व अनोंदणीकृत साध्या नोंदी 1 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आणि विवादग्रस्त नोंदी 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाही यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदार हे पर्यवेक्षण करणार आहेत. 

        जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या महसूल विभागातील मंडळ मुख्यालयात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी फेरफार आदालत आयोजित केली जाणार. फेरफार अदालतीसाठी संबंधित व्यक्तींनी संबंधित मंडळाच्या मुख्यालयी उपस्थित राहून मंडळ अधिकारी यांना आवश्यक ते कागदपत्र सादर करुन आपल्या नोंदी निर्गत कराव्यात, असे आवाहनही  जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी केले आहे.

 
Top