धाराशिव / प्रतिनिधी-

मागासवर्गीयांच्या निवाऱ्यासाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येणार्‍या रमाई घरकुल योजनेचे अनुदान मागील तीन महिन्यांपासून रखडले आहे. धाराशिव नगरपालिका प्रशासनाकडे लाभार्थ्यांना हेलपाटे मारूनही अनुदानाचे वाटप होत नसल्याने त्रस्त लाभार्थ्यांनी मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयात वास्तव्यासाठी येण्याचा इशारा दिला आहे.

नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण शहरात रमाई घरकुल योजना राबविली जात आहे. या घरकुलाचे समाजकल्याण विभागाकडून अनुदानही नगरपालिका प्रशासनाकडे वर्ग केले आहे. तरीही मागील तीन ते चार महिन्यांपासून लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्यात आलेली नाही. या लाभार्थ्यांनी घरकुल मंजूर झाल्यानंतर आपली कच्ची राहती घरे पाडली आहेत. सध्या उन्हाळ्यासोबतच अधूनमधून अवकाळी पाऊसही सुरू आहे. यामुळे अशा लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. पावसाळ्यापूर्वी घराचे बांधकाम पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याने नगरपालिका प्रशासनाने रमाई घरकुल योजनेचे अनुदान त्वरीत वितरीत करावे, अन्यथा लाभार्थी आपल्या घरगुती साहित्य, मुलाबाळांसह पालिका व जिल्हाधिकारी कार्यालयात वास्तव्यास येईल, असा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. या निवेदनावर सपना झेंडे, संध्या उबाळे, दीपाली वाघमारे, संध्या गालटे, सुनीता कांबळे, तारामती कांबळे, ज्योती जाधव आदी लाभार्थ्यांची स्वाक्षरी आहे.


 
Top