उमरगा/संवाददाता  

उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरचे उद्घाटन होऊन ५ वर्षाचा कालावधी उलटला परंतु अद्याप ट्रामा केअर सेंटर सुरू झालेले नाही. ट्रामा केअरसाठी असलेले तज्ञ डॉक्टर, नर्स व शिपाई असताना अधिका-यांचे इच्छाशक्ती अभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. हाडांचे स्कॅनिंग करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सिआर्म मशीन ५ वर्षांपासून रुग्णांची प्रतिक्षा करीत आहे. एकाही रुग्णांवर उपचार होत नसल्याने अपघात झालेल्या व आपात्कालीन रुग्णांना सोलापूर किंवा लातुरला पाठवले जात आहे. प्रवासादरम्यान अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. युतीच्या काळात उद्घाटन झालेले ट्रामा केअर महाविकास आघाडीच्या काळात सुरू झाले नाही आता जिल्हाला मिळालेल्या आरोग्यमंत्र्यांच्या काळात तरी चालू होईल का नाही याबाबत साशंकता आहे.

उमरगा शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे ट्रामा केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली आहे. ट्रॉमा केअर युनिटच्या माध्यमातुन अपघातांतील जखमीवर योग्य उपचार करणे यामुळे शक्य होणार आहे. ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीचे काम अडीच वर्षांपूर्वीच पूर्ण झाले होते. हाडांचे स्कॅनिंग करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सिआर्म मशीनसह लाखो रुपयांची बहुतांश यंत्रसामुग्रीही उपलब्ध आहे. तज्ञ डॉक्टर, नर्ससह आवश्यक कर्मचाऱ्यांची नियूक्ती झाली व युनिट प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यासाठी प्रतीक्षा होती. ७ एप्रिल २०१८ रोजी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी अनेक स्वप्न दाखवली होती. यानंतर तरी अपघातग्रस्त व्यक्तीला नुसती मलमपट्टी करून सोलापूर, लातूर किंवा खाजगी रुग्णालयात रेफर केले जाणार नाही अशी अपेक्षा होती. परंतु ५ वर्ष उलटुनही ट्रामा केअर सेंटर सुरू केलेले नाही. एकही किचकट शस्त्रक्रिया न करता रुग्णांना रेफर करण्यातच धन्यता मानली जात आहे. सुसज्ज इमारत, लाखो रुपयांची मशनरी व आवश्यक असलेला तज्ञ डाॅक्टर्स, नर्स, वर्ग ४ चे कर्मचारी, काॅट उपलब्ध असताना ट्रामा केअर सेंटर बंदच ठेवण्यात आले आहे. ट्रामा केअरच्या इमारतीमधील खोल्या बंदच आहेत. ट्रामा केअर सेंटर सुरुच करावयाचे नव्हते तर मशनरी का मागवली ? लाखो रुपयांची मशनरी धुळ खात पडून आहे. याला जबाबदार कोण ? ट्रामा केअरसाठी उपलब्ध कर्मचारी सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील का नाहीत ? पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले असताना सेंटर सुरू का होत नाही ? असे प्रश्न विचारले जात आहेत. युतीची सत्ता असताना उद्घाटन झालेले ट्रामा केअर महाविकास आघाडीच्या काळातही सुरु झाले नाही. आता जिल्हयाला आरोग्यमंत्र्यांच्या रुपाने पालकमंत्री मिळाले आहेत. आरोग्यमंत्री तरी हे ट्रामा केअर चालू करतील का नाही याबाबत साशंकता आहे.

 
Top