नळदुर्ग / प्रतिनिधी-

 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नळदुर्ग शहरात सुरू असलेल्या घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते अनेक दिवसांपासुन थकल्याने गरीब लाभार्थी अडचणीत आले आहेत. कांही लाभार्थ्यांनी आपले नाव यादीतुन कमी होईल या भीतीने  व्याजाने पैसे काढुन तर कांही लाभार्थ्यांनी जवळ असलेले सोन्याचे दागिने विकुन घरांचे बांधकाम सुरू केले आहे.मात्र आज बांधकामाचे हप्ते मिळत नसल्याने अनेक लाभार्थी अडचणीत आले आहेत. अनेक लाभार्थ्यांनी आपल्या घराचे बांधकाम बंद ठेवले आहे.

  गरीब नागरीकांना स्वताच्या हक्काचे व मजबुत तसेच सर्व सोईनियुक्त असे घर असावे हा उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना २ लाख ५० हजार रुपये अनुदान देण्याची ही क्रांतीकारी योजना सुरू केली आहे. नळदुर्ग शहरातही नगरपालिकेच्या माध्यमातुन प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. यासाठी एकुण १ हजार ४१४ लाभार्थ्यांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र घर जागेची अडचण, उर्वरित पैशाची कमतरता तसेच इतर कांही अडचणीमुळे ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम परवाना घेतला नाही अशा ६७८ लाभार्थ्यांची नावे या योजनेतुन वगळण्यात आली आहेत. शिल्लक राहिलेल्या ७३६ लाभार्थ्यांपैकी २०० लाभार्थ्यांनी आपल्या घरांचे बांधकाम पुर्ण केले आहे. तर सध्या शहरात १५० घरांचे बांधकाम सुरू आहे.

          सध्या ज्या लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम सुरू केले आहे त्या लाभार्थ्यांना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासुन बांधकामाचा हप्ताच मिळाला नाही त्यामुळे लाभार्थी अडचणीत आले आहेत. यातील अनेक लाभार्थ्यांनी खाजगी सावकाराकडुन व्याजाने पैसे घेऊन तर कांही लाभार्थ्यांनी जवळ असणारे थोडेफार सोन्याचे दागिने विकुन घरांचे बांधकाम सुरू केले आहे.

         नगरपालिकेने नोटीस देऊन तसेच स्पिकरवर अलाऊन्स करून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजुर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांनी तात्काळ घराचे बांधकाम सुरू करावे अन्यथा घरकुल यादीतुन नाव वगळण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले नाव कमी होईल या भीतीने घरांचे बांधकाम सुरू केले. मात्र हप्ते मिळत नसल्याने आज अनेकांनी आपले बांधकाम बंद ठेवले आहे.

       आज अनेक लाभार्थ्यांचे बांधकाम बेसमेंट होऊन वरचे बांधकाम झाले आहे. कांही लाभार्थ्यांचे बांधकाम तर स्लॅब पर्यंत झाले आहे. असे असताना गेल्या दीड ते दोन महिन्यांपासुन या लाभार्थ्यांना हप्ता मिळाला नाही. अशीच परिस्थिती राहिली तर ही योजना बारगळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज लाभार्थी बांधकाम करीत असताना नियमाप्रमाणे त्यांचे हप्ते निघणे गरजेचे होते मात्र हप्ते मिळत नसल्याने अनेक लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

        जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी या प्रकरणात लक्ष घालुन प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना त्यांचे घर बांधकामाचे हप्ते तात्काळ मिळावेत यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे. त्याचबरोबर नगरपालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनीही याबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करून लाभार्थ्यांचे थकीत हप्ते तात्काळ मिळावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते मिळत नसतील तर ही योजना नळदुर्ग शहरात बारगळण्याची शक्यता आहे.

 
Top