धाराशिव /प्रतिनिधी-

 मराठवाडा, विदर्भ व उर्वरीत महाराष्ट्र विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची मागणीसाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला.

जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  भारतीय संविधानाच्या 371 (2) कलमाप्रमाणे 1994 साली मराठवाडा, विदर्भ व उर्वरीत महाराष्ट्रासाठी विकास मंडळे अस्तित्वात आली. इ.स. 2020 पर्यंत नियमाप्रमाणे आपल्याकडून त्यांना मुदतवाढ देण्यात आली. या मंडळाअंतर्गत उद्योग, आरोग्य, दळणवळण, सिंचन इत्यादी समित्या स्थापन  झाल्या. त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने वेळोवेळी आपले अहवाल राज्यपालांना सादर केले. हे अहवाल राज्यपालांमार्फत महाराष्ट्र शासनाकडे सादर करण्यात आले.  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र मंत्रीमंडळाने ह्या मंडळांना मुदतवाढ देण्यात यावी असा ठराव संमत केला आहे. हा ठराव आपल्याकडे अंतिम मंजुरी व अध्यादेश काढण्यासाठी पाठविण्यात आला आहे. यावर त्वरेने कार्यवाही व्हावी यासाठी हे निवेदन आहे. कांही अगम्य कारणामुळे 2020 पासुन आजतागायत सुमारे 3 वर्षे मंडळांना मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे  मागास भागांवर अन्यास होत असून विकासाच्या योग्य कामांना अडथळे  निर्माण होत आहेत. सात सदस्यांच्या या समितीत 3 तज्ञ सदस्य, 2 महसूल विभागातील आयुक्त पातळीवरील पदाधिकारी व दोनच सदस्य लोकप्रतिनिधीमधुन आपल्या माध्यमातून निवडले जातात. त्यामुळे या मंडळातील नियुक्त्यांना कुणीही आक्षेप घेण्याचे कारणच नाही. पण योग्य कारण नसताना या मंडळाची मुदतवाढ 3 वर्षे अडकुन ठेवण्यात आली आहे . या अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच आजचे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने मराठवाडयात सर्वत्र तसेच आज धाराशिव जिल्ह्यात करण्यात येत आहे. मागास भागाच्या सर्वांगिण विकासाठी निर्माण करण्यात आलेली ही मंडळे तज्ञांच्या मार्गदर्शनासाठी वस्तूनिष्ठ अभ्यास करुन आपल्याकडे विभागाच्या विकासाच्या महत्वपूर्ण सूचना मांडतात. त्या मान्य करणे किंवा न करणे हा महाराष्ट्र विधीमंडळ व अंतत: आपला विशेष अधिकार असतो.

लोकशाही पद्धतीने विकास मंडळांना मुदतवाढ द्यावी व  विकासाचे  थांबलेले चक्र सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.आंदोलनात अध्यक्ष भाई धनंजय पाटील,उपाध्यक्ष  प्रा. राहुल पाटील, कोषाध्यक्ष गायकवाड एस. डी,सचिव संतोष हंबीरे , एडवोकेट  राज कुलकर्णी, सुदेश इंगळे, भाई अमोल दीक्षित, प्रा रवी सुरवसे, प्रा शेंडगे, भाई डॉ. पुरुषोत्तम पाटील,  बालाजी कोळी,  सचिन श्रीखंडे आदींनी सहभाग घेतला.


 
Top